नाणार प्रकल्पावरुन सध्या भाजपा आणि शिवेसनेमधील मंत्र्यांमध्येच चांगलीच जुंपली आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांनी अधिसूचना रद्द केल्याने नाणार प्रकल्प येणार नसल्याचं जाहीर करुन टाकलं. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांच्याकडे तो हक्कच नसल्याचं सांगत शिवसेनेला तोंडघशी पाडलं. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांविरोधात विधान करताना दिसत आहे. दरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा करुन प्रश्न सोडवता येतात असं सांगत संवाद साधण्याचं आवाहन केलं आहे.

सार्वजनिकपणे नाणार अधिसूचना रद्द करण्याचा शिवसेना मंत्र्यांच्या भूमिकेबाबत भाजपा नाराज असल्याचं सध्या बोललं जात आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्र्यांनी सार्वजनिकरित्या वक्तव्य करण्यापेक्षा एकमेकांशी संवाद साधायला पाहिजे. चर्चा करून प्रश्न सोडवता येतात असं म्हटलं आहे.

नाणार प्रकल्प विदर्भात व्हावा ही इच्छा मी स्वतः व्यक्त केली होती. विदर्भ राज्याला ऊर्जा पुरवतो. प्रदूषण सहन करतो..तर नाणार येऊ दे. पण प्रकल्पासाठी समुद्राची गरज आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी नाणारमधील सभेत बोलताना आशिष देशमुख यांनी नाणार प्रकल्प विदर्भात नेण्याची मागणी केल्याचा उल्लेख केला होता.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुभाष देसाईंनी नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचं पत्र दिलं आहे. स्थानिकांची मतं आणि कोकणवासियांचं हित लक्षात घेऊन सरकार निर्णय घेईल असं सांगितलं आहे.