देशभरात अवघी साठ हजार गिधाडे असून महाराष्ट्रातही त्यांची संख्या अत्यल्प झाल्यामुळे राज्यातील गिधाडांना वाचविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल व त्यासाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ची मदत घेतली जाईल, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

महाराष्ट्रात सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगेत तसेच कोकणात आणि रायगडमधील जंगलात गिधाडे असून प्रामुख्याने सह्य़ाद्रीच्या पर्वतसांगेतील पांढरपाठी जातीच्या गिधाडांवर उपासमारीमुळे बळी जाण्याची वेळ येत असल्याचे आढळून आले आहे. ‘डायक्लोफेनॅक’ या वेदनाशामक इंजक्शनच्या वायल वापरण्यावर केंद्र सरकारने जरी बंदी लागू केली असली तरी मोठय़ा प्रमाणात जनावरांवरील उपचारासाठी आजही त्याचा वापर होत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे गिधाडांची वस्ती असलेल्या भागात मृत जनावरे पुरण्यासाठी आग्रह धरला जातो व यातूनच गिधाडांना खाण्यासाठी मृत जनावरे कमी प्रमाणात उपलब्ध होऊन त्यांची उपासमार होते. यामुळे राज्य शासनाने गिधाडांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी ‘व्हल्चर रेस्टॉरंट’ उभारण्याचा निर्णय घेतला होता. यात गिधाडांचे अस्तित्व असलेल्या ठिकाणी मृतदेह उपलब्ध करून देण्याचे काम वनविभाग तसेच स्वयंसेवी संस्थाच्या माध्यामातून करून देण्याचा काम करण्यात येऊ लागले. तथापि या कामाला म्हणावे तशी गती न मिळाल्यामुळे गिधाडांच्या पिल्लांवर उपासमारीची वेळ येत असल्याचे एका वनअधिकाऱ्याने सांगितले.
‘बीएनएचएस’चे अतुल साठे यांनी आजघडीला एक टक्का गिधाडे शिल्लक असून देशातील चार राज्यांमध्ये गिधाडे संवर्धनाचे काम संस्थेच्या वतीने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी अडीचशे गिधाडे असून यापूर्वी कोकणातील दापोली, हरिहरेश्वर भागात एका सामाजिक संस्थेच्या मदतीने गिधाडे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गिधाडे वाचविण्यासाठी राज्य शासनाला सर्व सहकार्य केले जाईल, असेही साठे यांनी सांगितले.

जैव विविध बोर्डाच्या माध्यामातून तसेच ‘बीएनएचएस’च्या सहकार्याने महाराष्ट्रातील गिधाडांच्या प्रजाती वाचविण्यासाठी व्यापक कार्यक्रम राबविण्यात येईल तसेच गिधाडांना अन्न उपलब्ध करून देण्याबरोबर व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येईल.
– सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री