News Flash

साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची ४०० कोटींची फसवणूक?

कायद्याने किमान आधारभूत किंमत देणे बंधनकारक असतानाही कारखानदारांनी त्याचे पालन केलेले नाही

संग्रहित छायाचित्र

मुंबई : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या साखर कारखान्यांवर कठोर कारवाईचा इशारा सरकार वारंवार देत असले तरीही राज्यातील ४८ साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे किमान आधारभूत किमतीचे (एफआरपी) ४०० कोटी रुपये व दोन वर्षांपूर्वीच्या हंगामातील ७७ कोटी रुपयांची देणी अद्याप दिलेली नसल्याची  बाब उजेडात आली आहे.

या कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी दिल्याशिवाय त्यांना यंदाच्या हंगामासाठी गाळप परवाना न देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या ऊस दर नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे कारखान्याकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.

मुख्य सचिव डी. के. जैन यांच्या अध्यक्षतेखालील ऊस दर नियामक मंडळाची बैठक आज मंत्रालयात झाली. या बैठकीस सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून विट्ठल पवार, भानुदास शिंदे, पांडुरंग थोरात, प्रल्हाद इंगोले, शिवानंद दरेकर तर साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून तानाजी सावंत, सुरेश भोसले, श्रीराम शेटे, नितीन मोहोळकर आदी उपस्थित होते. राज्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांची विविध मार्गानी लुबाडणूक करीत असल्याचा आरोप या वेळी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी केला. राज्यातील ४० साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांचे ४०० कोटी रुपये थकवले आहेत.

कायद्याने किमान आधारभूत किंमत देणे बंधनकारक असतानाही कारखानदारांनी त्याचे पालन केलेले नाही. तसेच बारामती अ‍ॅग्रो, दौंड शुगर, व्यंकटेशकृपा, शिरूर, विट्ठलराव शिंदे, सोलापूर, सासवड माळी शुगर, सोलापूर, समर्थ आणि बागेश्वरी श्रद्धा एजन्सी, जालना या साखर कारखान्यांनी दोन वर्षांपूर्वीच्या गळीत हंगामातील महसुली उत्पादनानुसार शेतकऱ्यांना द्यावयाच्या रकमेपैकी ७७ कोटी रुपयांची देणी अद्याप दिलेली नसल्याची बाब या वेळी उघडकीस आली.शेतकऱ्यांची थकित देणी दिल्याशिवाय या कारखान्यांना गाळप परवाना न देण्याचा निर्णय झाला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 5:44 am

Web Title: sugar factories 400 crore fraud of farmers
Next Stories
1 वित्त आयोगाच्या टिप्पणीबाबत राज्य सरकारची नाराजी
2 राज्यात आयुष्मान भारत २३ सप्टेंबरपासून सुमारे ८४ लाख कुटुंबाची निवड
3 भाजपला घाबरलेल्या दोन्ही काँग्रेसने हिमतीवर स्वतंत्र लढून दाखवावेच
Just Now!
X