गळीत हंगामापूर्वी साठा विक्रीचे करण्याचे आदेश

येत्या ऊस गळीत हंगामापूर्वी केवळ आठ टक्के साखर शिल्लक ठेवून उर्वरित साठय़ाची विक्री करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशामुळे राज्यातील साखर कारखाने पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या या आदेशामुळे येत्या काही दिवसात राज्यात तब्बल ११ लाख मेट्रीक टन अतिरिक्त साखर बाजारात येणार असल्यामुळे साखरेचे भाव मात्र गडगडण्याची शक्यता असून  दिवाळी गोड होण्याची चिन्हे आहेत.

देशात सध्या साखरेचे भाव स्थिर असून प्रतिक्विंटल साधारणत: ३५०० ते ३६०० रूपये आहे. देशात यंदाच्या गळीत हंगामातही साखरेचे उत्पादन मागणीपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नवीन गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व साखर कारखान्यांनी त्यांच्याकडील गोदामात असलेल्या साखरेपैकी केवळ आठ टक्के साखर शिल्लक ठेवून उर्वरित साखर विक्री करावी असे आदेश सरकारने काढले आहेत. राज्यात येत्या १ नोव्हेंबर पासून गळीत हंगाम सुरु होत असून राज्य सरकारनेही या आदेशानुसार सर्व कारखान्यांनी त्यांच्याकडील साखर विक्री करावी अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे एकटय़ा महाराष्ट्रातून तब्बल ११ लाख मेट्रीक टन साखर पुढील काही दिवसांमध्ये बाजारात येण्याची शक्यता असून अन्य राज्यातूनही अशाच प्रकारे साखर बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यातच सणासुदीच्या काळात साखरेची भाववाढ होऊ नये यासाठी पाच लाख टन साखर आयात करण्याचे संकेत केंद्रीय अन्न-नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर साखरेचे भाव गडगडण्याची शक्यता वर्तविली जात असून त्याचा नागरिकांना फायदा होणार असला तरी साखर उद्योग आणि पर्यायाने शेतकऱ्यांनाही फटका बसणाची भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

खासदार शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन साखर कारखान्यांना त्यांच्याकडील साखरेचा साठा कमी करण्याची सक्ती करू नये अशी मागणी केली आहे. देशात सध्या साखरेचे भाव स्थिर असून काही राज्यात गळीत हंगाम सुरू झाला आहे. राज्यातही १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू होणार असून नवीन साखर लवकरच बाजारात येईल. मात्र त्यापूर्वीच साखर कारखान्यांकडील सर्व साखर एकाच वेळी बाजारात आली तर भाव गडगडतील. सध्या कारखान्यांच्या नफ्यातील ७० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना मिळत असून या निर्णयामुळे साखरेचे भाव गडगडतील आणि त्याचा फटका कारखान्यांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांनाही बसणार असल्याचे शेट्टी यांनी  मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. त्याचप्रमाणे केंद्रीय अन्न-नागरी पुरवठा राज्यमंत्री सी.आर. चौधरी यांचीही भेट घेऊन साखर आयुत करु नये अशी मागणी केली असून त्यांनीही सध्या भाव स्थिर असल्याने साखर आयात करणार नसल्याचे सांगितल्याचे शेट्टी यांनी सांगितले.