ऊस दरावरून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात पेटलेल्या आंदोलनामुळे या भागात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी तसेच काँग्रेसला फटका बसणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा महागात पडण्याची भीती लक्षात घेता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चुचकारण्यासाठी पंतप्रधाननियुक्त समितीचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांनाच आता प्रयत्न करावे लागणार आहेत. हा प्रश्न दरवर्षीच पेटू लागल्याने विजेच्या धर्तीवर उसाचे दर ठरविण्यासाठी नियामक प्राधिकरण स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, मंत्रिमंडळाच्या पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन पेटल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहे. शेतकरी आक्रमक होण्यात शेतकरी संघटनांबरोबरच स्थानिक राजकारणही कारणीभूत ठरले आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये पराभूत होणाऱ्या नेतेमंडळींनी काही ठिकाणी शेतकऱ्यांना भडकविल्याची माहिती पोलिसांकडे आली आहे. आंदोलन जेवढे अधिक तीव्र होईल तेवढा सत्ताधाऱ्यांनाच रोष सहन करावा लागणार आहे. दोन दशकांपूर्वी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केलेल्या आंदोलनानंतरच राज्याच्या ग्रामीण भागात शिवसेना वा भाजप या विरोधकांची ताकद वाढली होती याकडे लक्ष वेधण्यात येते.
शेतकऱ्यांना दर वाढवून द्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आली. परंतु साखरेचे भाव पडल्याने किती भाव द्यायचा यावर बंधने येत असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. साखर पट्टय़ात राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी काँग्रेसचीही बऱ्यापैकी ताकद आहे. महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेश, कर्नाटकमध्येही साखरेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याकरिता शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शेतकऱ्यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही. यामुळेच शेतकऱ्यांना पॅकेज देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होण्याची शक्यता आहे.

प्राधिकरणावरून मतभेद
उसाचे दर ठरविण्यासाठी नियामक प्राधिकरण स्थापन करण्याचे संकेत सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहेत. मात्र कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात अशा प्राधिकरणांचा अनुभव तेवढा चांगला नाही याकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लक्ष वेधले. ऊस आंदोलन पेटले असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा जाळणे किंवा सांगलीत जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेली फूस यातून काँग्रेस किंवा मुख्यमंत्री चव्हाण यांना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा आहे.