हरखलेल्या मुलांचे अध्यक्षांना धिटाईने प्रश्न

मुंबई : पैठण तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांनी पहिल्यांदाच विमानवारी करीत मुंबईत पाऊल ठेवले आणि विधिमंडळातही फेरफटका मारला. मुंबईतही प्रथमच आलेल्या या मुलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व अन्य नेत्यांच्याही भेटी घेतल्या. या चुणचुणीत मुलांनी अध्यक्ष बागडे यांना धिटाईने प्रश्न विचारले. कसून अभ्यास करा, नाहीतर ऊसतोड कामगार म्हणून गावातच राहवे लागेल, अशी सूचना करीत नियमित व्यायाम करण्याचाही सल्ला बागडे यांनी या मुलांना दिला.

पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी वरवंडी तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ४० मुलामुलींना व त्यांच्या काही शिक्षकांना औरंगाबादहून मुंबईचा विमानप्रवास घडविला व मुंब्ोई भेटीवर आणले. ऊसतोड कामगारांच्या मुलांनी प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव घेतल्याने आणि सोमवारी विधिमंडळही पाहिल्याने ती चांगली हरखून गेली होती. तुम्ही पहिला विमानप्रवास कधी केला, असा प्रश्न बागडे यांना केल्यावर मी आमदार झाल्यावर तो केल्याचे उत्तर त्यांनी दिले.

आम्ही पूर्वी एसटी व रेल्वेनेच फिरत असू, असे त्यांनी सांगितले. मुलांनी त्यांना शालेय जीवनातील गमतीचा किस्सा विचारला. तेव्हा पैठण तालुक्यातील पिंपरी गावातील शाळेत शिकत असताना १९५६-५७ च्या काळातील काही आठवणी बागडे यांनी मुलांना सांगितल्या. त्यावेळी टाय काय असतो, हे आम्हाला माहीतच नव्हते.

एक शिक्षक टाय घालून आल्यावर ‘हे गळ्यात लोढणे अडकवून आले,’ अशी चर्चा मुलांनी केल्यावर कशी शिक्षा झाली, हा किस्सा बागडे यांनी सांगितल्यावर जोरदार हशा पिकला.

शिक्षकांना न घाबरता प्रश्न विचारत राहा, भरपूर अभ्यास करा आणि व्यायामाचेही धडे गिरवा, असा वडिलकीचा सल्लाही हरिभाऊंनी मुलांना दिला. विधिमंडळाचे कामकाज पाहून मुंबईतील काही स्थळांच्या भेटीही या मुलांना घडविणार असल्याचे भुमरे यांनी सांगितले.