मुंबईतील मंत्रालयाच्या दारातच एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही महिला चेंबूरची असून तिने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले SRPF चे जवान, हवालदार डी. के. माने, पोलीस शिपाई के. डी. राऊत यांनी वेळीच महिलेच्या हातून रॉकेलची बाटली हातून काढून घेतली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुलीच्या लग्नासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते ज्याची परतफेड न करता आल्याने या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच खासगी सावकाराने पैसे परत करण्यासाठी तगादा लावला असाही आरोप या महिलेने केला आहे.

याआधी ऑगस्ट महिन्यात मंत्रालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. आता आज एका महिलेने कर्जाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला अशी माहिती समोर आली आहे. महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेताच पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी तिच्याकडे धाव घेतली आणि तिला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आलं. राधाबाई साळुंखे असं या महिलेचं नाव आहे. त्या मूळच्या बीडच्या आहेत अशीही माहिती समोर आली आहे.