वांद्रे-वरळी सागरीसेतूवरून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केलेल्या तरुणाची सीसी टीव्ही कॅमेरातील फुटेजच्या मदतीने अखेळ पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. भायखळा येथे राहणारा अक्षय राजेंद्र मादार (२३) असे या तरुणाचे नाव असून सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज पाहिल्यानंतर त्याच्या मित्राने त्याला ओळखल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भायखळा (प.) येथील हंजराज लेनमधील संजय अपार्टमेंटमध्ये राहणारा अक्षय कुलाब्याच्या गोकुळ हॉटेलमध्ये कामाला होता. तो हरवल्याची तक्रार भायखळा पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली होती. शनिवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास एका तरुणाने वांद्रे-वरळी सागरीसेतूवरून उडी मारून आत्महत्या केल्यामुळे पोलीस   तपास करीत होते. भायखळ्यातील दीपक राठोडला वांद्रे-वरळी सागरीसेतूवरील सीसी टीव्हीचे फुटेज दाखविल्यानंतर उडी मारणारा अक्षय आपला मित्र असल्याचे त्याने स्पष्ट केले.
भायखळा येथील खडा पारशी परिसरातून अक्षय टॅक्सीने वांद्रे येथे निघाला होता. त्यावेळी त्याने माकडटोपी घातली होती. सागरसेतूवर टॅक्सी येताच त्याने माकडटोपी काढली आणि टॅक्सी थांबविण्यास चालकास सांगितले. टॅक्सी थांबताच तो बाहेर पडला. उलटी होत असल्याचे भासवत तो सागरसेतूच्या कठडय़ावर चढत त्याने उडी मारली.

कामोठय़ात ३० लाखांचा ऐवज लांबवला
पनवेल : कामोठे येथील सेक्टर ११ मधील धर्मराज ज्वेलर्स या दुकानातून चोरांनी ३० लाखांचा ऐवज लांबवला असल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्वेलर्सच्या दुकानाच्या शेजारील गाळा एका फळविक्रेत्याने भाडय़ाने घेतला होता. त्याच गाळ्याच्या भिंतीला भगदाड पाडून चोरांनी ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला आणि एक किलो सोने व २५ किलो चांदी असा ऐवज लांबवला.