नायर रुग्णालयाच्या आवारातील टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी भीमसंदेश तुपे याने सोमवारी रात्री आत्महत्या केली. भूलशास्त्राच्या पहिल्या वर्षांत शिकणाऱ्या तुपेने भूल देण्यासाठी उपयोग होणाऱ्या दोन इंजेक्शनचे मिश्रण जास्त प्रमाणात टोचून घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घटनेपूर्वी तुपे औरंगाबाद येथील गावी गेला होता. रविवारी रात्री वसतीगृहात परतल्यानंतर सोमवारी दिवसभर त्याने रुग्णालयात काम केले. संध्याकाळी सहा वाजता काम आटोपून तो वसतीगृहातील खोलीत परतला. रात्री दहाच्या सुमारास रुग्णालयात डॉक्टरची निकड भासली. मात्र तुपे प्रतिसाद देत नसल्याने सहकारी त्याच्या खोलीपर्यंत आले. खोलीचे दार आतून बंद होते. ते तोडून आत शिरलेल्या सहकाऱ्यांना तुपे बेशुद्धावस्थेत आढळला. सहकाऱ्यांनी त्याला नायर रुग्णालयात आणले. मात्र उपचारांपुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी, तपास सुरू केला आहे. शवचिकित्सा आणि व्हिसेरा चाचणीद्वारे मृत्यूचे नेमके  कारण याबाबत स्पष्ट माहिती हाती लागू शकेल, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी तुपेचा मोबाइल ताब्यात घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी नायर रुग्णालयाच्या आवारातच पायल तडवी या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. तुपे याने टोकाचे पाऊल उचलण्यामागील कारण शोधण्यासाठी सर्व पैलू पडताळले जातील, असे आग्रीपाडा पोलिसांनी स्पष्ट केले.

तुपेचा मोठा भाऊ डॉक्टर असून शहरातील खासगी रुग्णालयात प्रॅक्टीस करतो. त्यानेच मृतदेह ताब्यात घेतला. तुपे याचे वडील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असून अर्धागवायूने आजारी आहेत.