अहमदनगरमधून लोकसभेच्या उमेदवारीसाठी शिफारस

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसने न सोडल्यामुळे नाराज झालेल्या सुजय विखे-पाटील यांनी अखेर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला. या निमित्ताने कॉंग्रेसच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याचा मुलालाही भाजपमध्येच भवितव्य दिसते, असा संदेश राष्ट्रीय राजकारणात देण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना यश आले आहे. नगरच्या उमेदवारीसाठी सुजय यांच्या नावाची शिफारस प्रदेश भाजपतर्फे केंद्रीय समितीला पाठवली जाईल, असे जाहीर करत फडणवीस यांनी सुजय यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

कॉंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने इतर एखाद्या जागेच्या बदल्यात ती सोडावी, असा कॉंग्रेसचा प्रयत्न होता. मात्र, राष्ट्रवादीने नगरची जागा सोडण्यास ठाम नकार दिल्याने अखेर सुजय यांनी भाजपची वाट धरली. डॉ. सुजय विखे-पाटील गेले काही दिवस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संपर्कात होते. विखे यांनी सकाळी महाजन यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली. त्यानंतर दुपारी वानखेडे स्टेडियम येथील गरवारे क्लबमध्ये विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशामुळे नगर हा आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. पक्षात येताना त्यांनी कुठलीही अट ठेवलेली नाही. लोकसभा निवडणुकीसाठी नगरमधून सुजय यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस आम्ही केंद्रीय समितीला पाठवणार आहोत, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. सुजय यांच्या भाजपप्रवेशामुळे आता नगरची जागा विक्रमी मतांनी निवडून येणार, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. अनेक पक्षांना आता उमेदवारही सापडत नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. आता भाजप २०१४ पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात आणि देशातही जिंकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तर मला भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल भाजप नेतृत्वाचा आभारी आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय हा माझा व्यक्तीगत निर्णय आहे. त्याच्याशी घरातील कोणाचाही संबंध नाही. हा निर्णय घेत असताना वडिलांशी चर्चा झाली पण त्यांच्या माझ्या निर्णयाला विरोध असावा, असे जाणवले, असे सुजय विखे यांनी पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच वडील राधाकृष्ण विखे यांचा राजकीय निर्णय हा त्यांचा विषय आहे. त्याबद्दल काही बोलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 नव्या-जुन्यांचा समन्वय साधण्याचे भाजपपुढे आव्हान

मोहनीराज लहाडे

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्य़ात भाजपची ताकद वाढणार असली तरी प्रत्यक्षात भाजपच्या वरिष्ठांना विखे यांच्या पक्षप्रवेशाला जिल्हा भाजपमधून होणारा विरोध मोडून काढावा लागला आहे. प्रवेशाचे पडसाद जिल्ह्य़ातील लोकसभेच्या दोन्ही जागांसह विधान सभेच्या निवडणुकीतही उमटणार आहेत.

१९९८ मध्ये डॉ. विखे यांचे आजोबा स्व. बाळासाहेब विखे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याचा परिणाम जिल्ह्य़ात भाजप-सेनेला पाय रोवण्यात झाला होता. आता असाच राजकीय हादरा त्यांच्या नातवाने दिला आहे.  विखे यांच्या नगरमधीलच निवडणुकीने २९ वर्षांपासून शरद पवारांशी राजकीय वितुष्ट निर्माण झाले. याच वितुष्टातून पवार यांनी आता नगरची जागा सोडण्यास नकार दिल्यानंतर आता विखे-पवार यांच्यातील राजकीय वैमनस्याची परंपरा तिसऱ्या पिढीतही कायम राहील.

बाळासाहेब विखे यांच्या समवेत राधाकृष्ण विखे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र प्रवेशानंतर विखे गट कधीच शिवसेनेत एकरूप होऊ शकला नव्हता. विखे सेनेतून बाहेर पडून स्वगृही आल्यानंतर पुन्हा त्यांचा सर्व गट काँग्रेसमध्ये आला. स्व. विखे यांचा मूळचा शिर्डी मतदारसंघ राखीव झाल्याने, अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवायचीच अशा इरेला पेटलेल्या डॉ. विखे यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत मतदारसंघात युवकांची बांधणी केली. डॉ. विखे यांच्या पक्षप्रवेशानंतर आता विखे गटातील कार्यकर्ते भाजपशी किती एकरूप होणार, हा प्रश्न आहेच.  मूळच्या डाव्या विचारांच्या जिल्ह्य़ात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्राबल्यानंतर विखे यांच्या बंडामुळेच तो भगव्या विचारांकडे झुकला गेला. आता डॉ. विखे यांच्या प्रवेशाने किमान भाजपला तरी जिल्ह्य़ात अधिक उभारी मिळणार आहे.

एकेकाळी नगर शहराचा अपवाद वगळला तर पूर्वी भाजप व सेनेचे अस्तित्व औषधालाही जाणवायचे नाही. विखे यांच्या सेनेतील प्रवेशानंतरच भाजप व सेनेचेही अस्तित्व जाणवू लागले. त्याचा उपयोग दोन्ही पक्षाला जिल्ह्य़ात पाय रोवण्यासाठी झाला. विखे यांच्या सेनेतील प्रवेशानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली .नंतर पुन्हा विखे काँग्रेसमध्ये आल्यानंतर विखे-थोरात यांच्यातील वादाने भाजप-सेना युतीची परिस्थिती भक्कम होत गेली. आता तर जिल्हा काँग्रेसची जबाबदारी थोरातांवर येऊन पडली आहे. राष्ट्रवादीची अवस्थाही खिळखिळी झाली आहे.

खासदार दिलीप गांधी नाराज

’मी पूर्वीच्या जनसंघापासून भाजपचा कार्यकर्ता आहे. यापुढेही भाजपचाच कार्यकर्ता म्हणून राहणार आहे. पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला तो मान्य आहे. ’पक्षाने डॉ. सुजय विखे यांचे स्वागत केले असल्याने मलाही त्यांचे स्वागत करणे क्रमप्राप्तच आहे.

’परंतु लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. विखे यांचे नाव पक्षाच्या संसदीय मंडळाकडे पाठवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले, तो त्यांचा निर्णय आहे. ’त्याबाबत मी आताच काही बोलणार नाही. योग्य वेळी मी त्यावर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले.