नाटय़सृष्टीची मातृसंस्था असलेल्या नाटय़ परिषदेच्या निवडणुकीतील गोंधळापायी ‘सुखान्त’ या नाटकाचा यशवंत नाटय़मंदिरातील बुधवारचा प्रयोग रद्द झाला. नाटय़ परिषदेच्या कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्ताचा परिणाम तिकीट विक्रीवर झाल्याने आतापर्यंत तिकीट विक्रीत २५ हजारांच्या खालचा आकडा न पाहिलेले या नाटकाचे सूत्रधार मंगेश कांबळी यामुळे पुरते धास्तावले आहेत.
नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत मतपत्रिका गायब झाल्याचा आरोप एका पॅनलने केला. त्याबाबत पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांच्याकडे तक्रार दाखल झाली. त्यानंतर नाटय़ परिषदेच्या यशवंत नाटय़मंदिराशेजारील कार्यालयाबाहेर पोलीस ताफा नियुक्त करण्यात आला. बुधवारी दुपापर्यंत आमच्या नाटकाची केवळ चार तिकिटे विकली गेली  आणि केवळ ७०० रुपये तिकीटविक्री झाल्याचे कांबळी म्हणाले. गेल्या आठवडय़ातच शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला २७ हजार तिकीट विक्री झाली होती. तसेच १६ तारखेला डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहातील प्रयोगासाठी आत्ताच १८०० रुपयांची तिकिट विक्री झाली आहे. आमच्या प्रत्येक प्रयोगाला किमान २५ हजार रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे एवढय़ा कमी विक्रीमुळे धक्का बसला, असे मंगेश कांबळी म्हणाले