ठाण्यातील ‘सुल्झर पंप्स’ कंपनीतील कामगारांना सलग सातव्या वर्षी एक लाख रुपयांहून जास्त बोनस जाहीर करण्यात आला आहे. एवढा मोठा बोनस देणारी ही देशातील एकमेव कंपनी असून या कंपनीच्या कामगारांना गणेशोत्सवापूर्वीच बोनसची ‘दिवाळी’ भेट देण्यात आली.
जगभरातील मंदीच्या सावटाचा भारतातही फटका बसला आहे. कंत्राटी पद्धतीमुळे कामगारांचे आयुष्यच अस्थिर झाले आहे. अशा वेळी राजन राजे यांच्या नेतृत्वाखालील धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाने सुल्झर पंप्समधील ५४६ कामगार-कर्मचाऱ्यांना सलग सातव्या वर्षी एक लाख रुपयांचा बोनस मिळवून दिल्याने कामगार क्षेत्रात त्याची चर्चा आहे. कामगार व व्यवस्थापन यांच्या उत्तम समन्वयातून कंपनीला मिळणाऱ्या नफ्यात कामगारांना योग्य वाटा देण्याचा निर्णय घेण्यात आला. २००७ साली कंपनीबरोबर राजन राजे यांनी करार केला त्या वेळी एक लाख १० हजार रुपये बोनस देण्यात आला. तेव्हापासून सातत्याने या बोनसच्या रकमेत वाढच झाली आहे. यंदा कामगारांना गणेशोत्सवापूर्वी एक लाख ५० हजार रुपये बोनस देण्यात आला. कंपनीच्या वार्षिक नफ्याच्या १२ टक्के रक्कम कामगार- कर्मचाऱ्यांना समप्रमाणात वाटली जाते, असे राजन राजे यांनी सांगितले.