चित्रपटांमधून विविध सामाजिक विषय समर्थपणे हाताळणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या सुमित्रा भावे यांना यंदाचा ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार -२०२०’  प्रदान करण्यात येणार आहे. मुंबईत येत्या शुक्रवारी (११ डिसेंबर) होणाऱ्या छोटेखानी समारंभात भावे यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येईल.

पुरस्कार सोहळ्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी या सुमित्रा भावे यांची मुलाखत घेणार असून रसिकांना ‘ऑनलाइन’ माध्यमातून या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल.

भावे यांनी १९८४ मध्ये लघुपटाच्या माध्यमातून चित्रपट कारकीर्द सुरू केली. ‘दोघी’, ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘संहिता’, ‘अस्तू’, ‘कासव’ यांसारखे एकूण १४ चित्रपट सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केले आहेत. रोजच्या जगण्यातील अनुभवांना भिडणाऱ्या साध्या माणसांच्या गोष्टी आणि उत्कृष्ट व्यक्तिचित्रण हे भावे यांच्या लेखन-दिग्दर्शनाचे वैशिष्टय़. राष्ट्रीय पुरस्कारांसह इतरही अनेक पुरस्कार त्यांच्या चित्रपटांना लाभले आहेत.

‘लोकसत्ता- नवदुर्गा’ उपक्रमांतर्गत दरवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या नऊ कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव केला जातो. या पुरस्कारांचे हे सातवे वर्ष आहे. यंदा या उपक्रमांतर्गत आदिवासी कुमारी मातांचा प्रश्न लावून धरणाऱ्या डॉ. लीला भेले, कलासंवर्धक मधुरा जोशी-शेळके , निराधार वृद्धांसाठी पुढाकार घेणाऱ्या डॉ. अपर्णा देशमुख, नेत्रहीन असूनही अनेक अडचणींवर मात करणाऱ्या साहाय्यक जिल्हाधिकारी प्रांजल पाटील, ग्रामीण भागात आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी अहंकारी, पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात ‘ब्राऊन लीफ’ या व्यासपीठामार्फ त कार्यरत असलेल्या अदिती देवधर, वारली आदिवासींच्या चित्रांना वेगळी ओळख देणाऱ्या चित्रकार चित्रगंधा सुतार, स्त्रियांच्या शरीरसौष्ठव खेळात उत्तुंग कामगिरी केलेल्या स्नेहा कोकणेपाटील आणि कुपोषणमुक्तीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या रंजना करंदीकर या नवदुर्गा पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

या सर्व नवदुर्गाना त्यांच्या घरी जाऊन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारविजेत्या नवदुर्गा शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात ऑनलाइन माध्यमातून सहभागी होणार आहेत.

भावेंशी भावसंवाद

पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कु लकर्णी या सुमित्रा भावे यांची मुलाखत घेणार आहेत. रसिकांना ‘ऑनलाइन’ माध्यमातून या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल.

सहभागासाठी येथे नोंदणी आवश्यक. https://tiny.cc/LS_DurgaAwards_11Dec

यंदाच्या दुर्गा

– डॉ. लीला भेले (सामाजिक कार्यकर्त्यां)

– मधुरा जोशी-शेळके (कलासंवर्धक)

– डॉ. अपर्णा देशमुख (सामाजिक कार्यकर्त्यां)

– प्रांजल पाटील (साहाय्यक जिल्हाधिकारी)

– डॉ. शुभांगी अहंकारी (स्त्रीरोगतज्ज्ञ)

– अदिती देवधर (पर्यावरण कार्यकर्त्यां)

– चित्रगंधा सुतार (वारली चित्रकार)

– स्नेहा कोकणेपाटील (शरीरसौष्ठवपटू)

– रंजना करंदीकर (सामाजिक कार्यकर्त्यां)

सामाजिक भान जपणारी दिग्दर्शिका

सुमित्रा भावे यांनी अनेक अस्पर्श सामाजिक विषय चित्रपटांतून संवेदनशीलतेने हाताळले. त्यांच्या गोष्टी अंतर्मुख करणाऱ्या आणि सामाजिक भान निर्माण करणाऱ्या आहेत. उत्कृष्ट व्यक्तिचित्रण हे भावे यांच्या चित्रपटांचे वैशिष्टय़. त्यांच्या चित्रपटांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळवले आहेत.

प्रायोजक

* प्रस्तुती : ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

* सहप्रायोजक :  महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळ.

* पॉवर्ड बाय : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., यश कार्स, राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.