गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील अन्यायाबाबत संघटित निषेधाचे सुमित्रा भावे यांचे आवाहन

न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्यांचा संघर्ष चितारणारा रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ हा चित्रपट परीक्षकांनी निवड करूनही केवळ नावावरूनच ‘इफ्फी’तून वगळण्याचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कारभार म्हणजे चित्रपटकर्मीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. आणि असा प्रकार खुद्द मंत्र्यांकडून होत असेल तर तो अयोग्य आहे. त्याविरोधात ‘इफ्फी’च्या पॅनोरमा विभागासाठी निवडल्या गेलेल्या सगळ्या मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी एकत्र येऊन निषेधाची ठाम भूमिका घ्यायला हवी, असे आवाहन ‘कासव’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या दिग्दर्शक सुमित्रा भावे यांनी केले आहे.

४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) पॅनोरमा विभागातून निवड झालेल्या मराठी चित्रपटांची संख्या लक्षणीय आहे. रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ हा चित्रपट याच विभागातून शुभारंभाचा चित्रपट म्हणून पॅनोरमाच्या परीक्षक समितीकडून निवडला गेला होता. मात्र समितीकडून गेलेल्या यादीत बदल करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘न्यूड’ आणि सनाल शशीधरन यांचा ‘एस दुर्गा’ हा मल्याळम चित्रपट परीक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता वगळले. मंत्रालयाच्या या निर्णयाबद्दल रवी जाधव आणि शशीधरन या दोघांनीही समाजमाध्यमांवरून जाहीर नाराजी व्यक्त केली. परीक्षकांचा निर्णय अंतिम असताना त्यांचे मत डावलण्याचा मंत्रालयाचा परस्पर कारभारही चित्रपटवर्तुळातील जाणकार, संवेदनशील दिग्दर्शकांना रुचला नाही. परीक्षकांसह अनेकांनी याविरोधात आपला असंतोष प्रकट केला. खुद्द परीक्षक समितीचे नेतृत्व करणाऱ्या दिग्दर्शक सुजॉय घोष यांनीही सरकारच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत आपल्या परीक्षकपदाचा राजीनामा दिला. सरकार किंवा कोणीही मंत्री अशाप्रकारे हस्तक्षेप करत चित्रपट वगळत असतील तर ते अयोग्य आहे. अशावेळी मराठी चित्रपटकर्मीनी रवी जाधव यांच्यामागे ठाम उभे राहायला हवे. किंबहूना, ‘पॅनोरमा’मध्ये ज्या मराठी चित्रपटांची निवड झाली आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन महोत्सवात चित्रपट दाखवायचे की नाहीत, याबद्दल निर्णय घ्यायला हवा.

एकत्रित येऊन निषेध व्यक्त करायला हवा, असे आग्रही मत सुमित्रा भावे यांनी व्यक्त केले आहे. यंदा ‘इफ्फी’साठी ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात ‘कासव’, ‘क्षितिज-एक हॉरिझॉन’, ‘कच्चा लिंबू’, ‘मुरांबा’, ‘पिंपळ’, ‘माझं भिरभिरं’, ‘रेडू’, ‘इडक’, ‘व्हेंटिलेटर’ अशा नऊ मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. या यादीतला दहावा मराठी चित्रपट ‘न्यूड’ हा खरेतर परीक्षकांनी ‘इंडियन पॅनोरमा’चा शुभारंभाचा चित्रपट म्हणून निवडला होता. हा बहुमान मिळवणारा ‘न्यूड’ हा पहिला मराठी चित्रपट ठरणार होता मात्र आता त्याऐवजी विनोद काप्रींचा ‘पिहू’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. चित्रपट न पाहता केवळ नावावरून तो वगळणे म्हणजे सरकारकडूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते आहे, हे उघड असल्याचे मत व्यक्त करत मराठी चित्रपटकर्मीनी याबद्दल असंतोष व्यक्त केला आहे.

निषेधार्ह आणि अन्यायकारक

मान्यताप्राप्त परीक्षकांकडून निवडण्यात आलेले ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे दोन चित्रपट वगळण्याचा केंद्र शासनाचा निर्णय निषेधार्ह, अत्यंत चुकीचा आणि अन्यायकारक आहे. हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा आणि प्रादेशिक चित्रपटांच्या सर्जनशीलतेला मारणारा आहे. महोत्सवापासून दूर राहून या निर्णयाचा निषेध करणे हा उपाय नाही तर प्रत्यक्ष महोत्सवास उपस्थित राहून निषेध केला पाहिजे. ‘मुरांबा’चा चमू महोत्सवास उपस्थित राहून सरकारच्या या निर्णयाचा निषेध करणार आहे. देश-विदेशातील उपस्थित प्रतिनिधींसमोर आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत. महोत्सवात हे चित्रपट दाखविले जाणार नसतील तर वेगळ्या पद्धतीने ते दाखविले गेले पाहिजेत.  – नितीन वैद्य निर्माते-‘मुरांबा’

मराठी चित्रपटसृष्टी एकत्र आली ही सकारात्मक बाब

‘न्यूड’ चित्रपटाला वगळण्यात आल्याच्या निमित्ताने सर्व मराठी चित्रपटसृष्टी एकत्र आली ही चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे. मराठीतील सर्वानी एकत्र येऊन या निर्णयाचा निषेध केला आणि आम्हाला पाठिंबा दिला त्यासाठी सर्वाचे खरोखरच आभार आणि धन्यवाद. मान्यताप्राप्त परीक्षकांनी ‘न्यूड’ची निवड केली होती आणि तरीही चित्रपट वगळला गेला हे चुकीचे आहे. परीक्षक किंवा आम्हाला कोणतीही कल्पना न देता, कारणे न सांगता हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या संबंधित मंत्रालयाने ‘न्यूड’ चित्रपट न पाहताच हा निर्णय घेतला आहे, असे वाटते. कारण त्यांनी चित्रपट पाहिला असता तर असा निर्णय घेतलाच नसता.  – रवी जाधव निर्माते-दिग्दर्शक ‘न्यूड’

प्रादेशिक चित्रपटांची गळचेपी करणारा निर्णय

मान्यताप्राप्त परीक्षकांकडून निवड झालेले दोन चित्रपट महोत्सवातून वगळण्याचा केंद्र शासनाचा हा निर्णय निंदनीय तसेच प्रादेशिक चित्रपटांवर अन्याय आणि त्यांची गळचेपी करणारा आहे. परीक्षकांनी निवड केलेल्या आणि घेतलेल्या निर्णयावर परस्पर फेरफार करणे योग्य नाही. महोत्सवास उपस्थित राहून आम्ही या निर्णयाचा निषेध करणार आहोत.   प्रसाद ओक दिग्दर्शक ‘कच्चा लिंबू’