विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबई : कमाल तापमान आणि हवेतील बाष्पामध्ये झालेल्या वाढीमुळे उन्हाच्या झळा तीव्र होत असून घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. त्याचवेळी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात शुक्रवारी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.

दोन आठवडय़ांपूर्वी राज्यभरात विविध ठिकाणी गारांचा पाऊस पडला. मुंबईतही या अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. या काळात तापमान नियंत्रणात राहिले होते. मात्र पाऊस जाताच तापमापकातील पारा थोडा वर चढला. या काळात हवेतील बाष्पाचे प्रमाणही वाढले. तापमानातील बाष्पाच्या प्रमाणामुळे सध्या वास्तविक तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवत आहे.

एप्रिल महिन्यातच सकाळी ११ च्या सुमारास उन्हाच्या गरम वाफा जाणवत आहेत. कमाल तापमानाचा पारा ३५ अंश से. पुढे गेला नसला तरी अंगाची मात्र काहिली होत आहे. कमाल तापमान ३४ अंश से. असूनही हवेतील बाष्पाचे प्रमाण ७० टक्क्य़ांपर्यंत पोहोचल्याने उकाडा वाढल्याचे जाणवते. सोमवारपासून कमाल तापमानासह हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले आहे.

गुरुवारी सांताक्रूझ येथे ३४.८ अंश से. आणि कुलाब्यामध्ये ३२.५ अंश से. कमाल तापमान नोंदले गेले. हवेतील बाष्पाचे प्रमाण अनुक्रमे ५३ आणि ६९ टक्के नोंदवले गेले.

राज्यातही काहिली

पुणे : कोरडय़ा हवामानामुळे राज्याच्या तापमानात लक्षणीय वाढ नोंदविली जात असल्याने उन्हाच्या तीव्र चटक्यांनी नागरिकांची होरपळ  होत आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात शुक्रवारी (२६ एप्रिल) उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ही लाट पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी म्हणजे ४६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

विदर्भात अकोल्यासह अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा आदी भागात कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मराठवाडय़ात परभणी येथे ४५ अंश, तर इतर ठिकाणी ४२ अंशांवर तापमान आहे. मध्य महाराष्ट्रात नगर, जळगाव येथे ४३ अंशांवर, तर पुणे, सोलापूर, सांगली आदी भागात ४१ ते ४२ अंशांवर तापमान नोंदविले जात आहे.

एप्रिलअखेरीस पावसाळी स्थिती?

बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या दक्षिणेकडील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याची तीव्रता वाढत जाऊन ३० एप्रिलपर्यंत तामिळनाडूलगतच्या समुद्रात चक्रीवादळाचे संकेत आहेत. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातही पावसाळी स्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज आहे.