गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचे प्रमाण वाढल्यामुळे त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा येणे, ग्लानी येणे, कणकण जाणवणे, पित्त वाढणे, डोके दुखणे अशा अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहेत. मात्र या लहान आजारांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

काल तापमानाच्या पाऱ्याने ३६चा आकडा पार केला असून वयस्कर व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि डोकेदुखीचा त्रास वाढत आहे. तर रोज लांबचा प्रवास करणारा नोकरदार वर्ग पित्त वाढणे, काम करण्याची इच्छा न होणे, मळमळ होणे, पोटामध्ये बिघाड होणे या त्रासाने त्रस्त आहे.

उपाय म्हणून  दिवसाला किमान दोन ते अडीच लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याबरोबरच पाणीयुक्त फळे, लिंबू पाणी, पन्हं आणि ताक या पदार्थाचे सेवन करीत राहिल्यास शरीरातील पाण्याचा समतोल राखला जाऊ शकतो. त्याबरोबरच बाहेरील तेलकट, तुपकट पदार्थ खाणे टाळावे त्यामुळे पोट खराब होणे, पित्त वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये घरी बनविलेल्या अन्नाला प्राधान्य द्यावे. उन्हाळ्यात भूक मंदावते त्यामुळे कित्येक जण दुपारचे जेवण टाळतात मात्र  खाणे हे आरोग्यासाठी लाभकारी आहे, असे नायर रुग्णालयातील डॉक्टर राकेश भदाडे यांनी सांगितले.

उन्हाळ्यात  पारंपरिक पेयांना प्राधान्य द्यावे. यामध्ये पुदिना अत्यंत गुणकारी असून रोजच्या पाण्याच्या बाटलीमध्ये पुदिन्याची पाने टाकावीत. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या शरीराला पाण्याबरोबरच पुदिन्याचा थंडावा मिळेल. रोजच्या आहारातील चहाचे प्रमाण कमी करावे.  गूळ आणि पाणी हे शरीरासाठी अतिशय लाभकारक आहे. त्वचेवरील संसर्ग होण्याचा धोकाही या दिवसांमध्ये अधिक असतो. आजारांवर बचाव म्हणून खूप पाणी पिणे, बाहेरील पदार्थ टाळणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे याचा अवलंब केला तर उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेतली जाऊ शकते, असे डॉ. रत्नाराजे थार यांनी सांगितले.