घातक सूक्ष्मकणांचे प्रमाण सलग दोन वर्षे वाढतेच

मुंबई : उद्योगधंदे, वाहतूक असे प्रदूषणाचे मोठे स्रोत पूर्णपणे बंद असलेल्या टाळेबंदीच्या काळातही मुंबईकरांनी प्रदूषित उन्हाळा अनुभवला. २०१९ ते २०२१ या काळातील मार्च, एप्रिल, मे या महिन्यांत पीएम २.५चे (२.५ मायक्रॉन आकाराचा घातक सूक्ष्मकण) प्रमाण मुंबईत वाढताना दिसत आहे.

‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या हवा गुणवत्ता आकडेवारीच्या आधारे ‘क्लायमेट ट्रेण्ड्स’ने के लेल्या अभ्यासातून ही बाब उघड झाली आहे. मुंबई, दिल्ली, लखनौ आणि कोलकाता या शहरांतील टाळेबंदीपूर्वीची २०१९ सालची हवा गुणवत्ता आणि २०२०, २०२१ या टाळेबंदीच्या वर्षांतील हवा गुणवत्ता यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. मुंबईतील पीएम २.५ चे सरासरी प्रमाण मार्च ते मे २०१९ या काळात २१.६ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होते. त्यात वाढ होऊ न २०२० साली हे प्रमाण ३१.३ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर व २०२१ मध्ये ४०.३ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटपर्यंत गेले.

प्रदूषणाच्या आठ स्रोतांपैकी बांधकाम, उद्योग, वीटभट्टय़ा,वाहने हे चार स्रोत बंद होते. घरगुती वायू, आग, डिझेल निर्मिती, धूळ, कोळशावरील विद्युतनिर्मिती के ंद्र हे स्रोत कमी क्षमतेने सुरू होते. असे असतानाही मुंबईतील पीएम २.५चे प्रमाण गेली २ वर्षे सलग वाढलेले दिसत आहे. ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या निर्देशानुसार पीएम २.५ साठी ४० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर हे सुरक्षित प्रमाण आहे. यानुसार मुंबईचे प्रदूषण कमी भासत असले तरीही त्याचा आलेख चढता असणे ही चिंतेची बाब आहे.

कारण काय?

२०२१ या वर्षांत टाळेबंदी काही अंशी शिथिल करण्यात आली. त्यामुळे प्रदूषणाचे बरेचसे स्रोत पूर्ववत सुरू होऊन प्रदूषण वाढले. २०२० साली कठोर टाळेबंदीच्या काळातही प्रदूषण वाढण्याचे कारण मात्र वेगळे आहे. मुंबई हे शहर समुद्रकिनारी वसल्याने येथे स्थानिक वातावरण आणि सार्वत्रिक वातावरणातील मोठे बदल यांचा मिश्र प्रभाव जाणवतो. प्रदूषणाचे स्थानिक  स्रोत बंद असले तरीही भोवतालच्या राज्यांतून येणारे प्रदूषण मुंबईला प्रदूषित करते.