उन्हाळी सुटय़ांमध्ये कोकणातल्या आपल्या गावाकडे जाणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी मध्य तसेच कोकण रेल्वे यांनी एकमेकांच्या सहकार्याने रेल्वेने उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी शुक्रवार, २९ एप्रिल रोजी मुंबईहून निघणार असून शनिवारी ती करमाळीहून मुंबईसाठी रवाना होईल. शुक्रवारी मुंबईहून निघणाऱ्या या गाडीचे आरक्षण गुरुवार, २८ एप्रिल रोजी सुरू होणार आहे.
मध्य रेल्वे तसेच कोकण रेल्वेने या उन्हाळ्यात कोकणवासीयांसाठी आणखी एक नवी गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ०१०२१ डाउन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-करमाळी ही गाडी २९ एप्रिल रोजी रात्री ११.५५ वाजता सुटेल.
ही विशेष गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता करमाळी येथे पोहोचेल. तर, ०१०२२ अप करमाळी-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ही गाडी करमाळीहून ३० एप्रिल रोजी दुपारी १.१० वाजता निघेल. ही गाडी त्याच रात्री ११.५० वाजता मुंबईला
पोहोचेल.

गाडीचे थांबे..
गाडीला २१ डबे असून ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल. या गाडीचे आरक्षण आज, गुरुवारी सुरू होणार आहे. या गाडीचे तिकीट ‘विशेष दरांत’ उपलब्ध असेल, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.