घामाच्या धारा; पारा ३५वर

गेल्या आठवडय़ापर्यंत गारव्याचा अनुभव घेणाऱ्या मुंबईला आता उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. उन्हाळा सुरू होण्याच्या टप्प्यावरच शहराचे कमाल तापमान शनिवारी ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. मुंबई परिसरातील नागरिक आठवडय़ाच्या अखेरीस घामाच्या धारांनी निथळत होते.

फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत मुंबईसह राज्यात थंडी होती. त्यानंतर हळूहळू तापमान वाढू लागले. गेल्या चार दिवसांपासून शहरातील उकाडा वाढला आहे. कमाल आणि किमान तापमानाबरोबरच हवेतील आद्र्रताही काहीशी वाढली आहे. वेधशाळेच्या सांताक्रूझ विभागाच्या नोंदीनुसार मुंबई आणि परिसरात शनिवारी कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस, तर आद्र्रता ८८ टक्के होती. वेधशाळेच्या कुलाबा विभागाने ३१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली आणि आद्र्रतेचे प्रमाण ८६ टक्के नोंदवले. होळीआधीच यंदा उन्हाचे रंग जाणवण्याची चिन्हे आहेत.

तापभान..

किमान तापमानात वाढ झाल्यामुळे सकाळी जाणवणारा गारवा बेपत्ता झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी वाढणार असून सकाळी उन्हाच्या झळा जाणवणार आहेत.  शहरात शनिवारी वेधशाळेच्या सांताक्रूझ विभागाने किमान तापमान २२ अंश सेल्सिअस तर कुलाबा विभागाने १८.८ अंश सेल्सिअस नोंदवले. पुढील दोन दिवस कमाल तापमान साधारण ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.