दिवाळीच्या पहिल्या दिवशी येणारे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. ग्रहणच दिसणार नसल्याने कोणत्याही धार्मिक नियमांची आडकाठी न होता दिवाळीचा पहिला दिवस दणक्यात साजरा करता येईल, असे खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे मंगळवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०१२ या दिवशी अश्विन अमावास्या असून उत्तररात्री २.०५ ते ५.१८ या वेळेत खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महागराच्या काही भागातून दिसेल. त्याचप्रमाणे न्यूझीलंड आणि दक्षिण अमेरिका येथूनही हे सूर्यग्रहण दिसेल, असे सोमण यांनी सांगितले. आपल्याकडे हे सूर्यग्रहणच दिसणार नसल्याने यादिवशी ग्रहणविषयक वेधादि कोणतेही धार्मिक नियम पाळण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दिवशी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असते. यावेळी संध्याकाळी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त पाहून त्याप्रमाणे यथासांग पूजाविधी केले जातात. ग्रहणामुळे या पूजेत कोणतीही बाधा येणार नसल्याने  दिवाळीचा पहिला दिवस विधीवत साजरा करता येईल, असेही सोमण यांनी स्पष्ट केले आहे.