पुण्यात नववर्षाच्या स्वागताला ‘सनबर्न’च्या आयोजकांना फेस्टिव्हल झाल्यानंतर दंड आकारणीला सामोरे जावे लागल्यानंतर मुंबईत ‘सनबर्न’चा कार्यक्रम थेट रद्दच करण्यात आला आहे. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथे शुक्रवारी होणारा ‘सनबर्न’च्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ऐनवेळी आयोजकांना कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. ‘सनबर्न’च्या आयोजकांकडून आवश्यक त्या कायदेशीर औपचारिकता आणि कागदपत्रे पूर्ण न झाल्याने कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन करण्याला आमचा कोणताच विरोध नाही, पण आयोजकांनी सर्व कायदेशीरबाबींची पूर्तता केल्यानंतरच त्यांना कार्यक्रम घेता येऊ शकतो. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेचीही माहिती त्यांनी पोलिसांना द्यायला हवी होती, असे झोन ८ चे पोलीस उपायुक्त व्ही. मिश्रा यांनी सांगितले.

वाचा: सनबर्नला सनातनचा विरोध; अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा आरोप

 

रितसर परवानगी नसतानाही जर आयोजकांनी कार्यक्रम घेतला तर आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यांनी आदेशांचे पालन करायला हवे, असेही मिश्रा म्हणाले. ‘सनबर्न’सारखे मोठे कार्यक्रम आयोजित करताना त्याची रितसर पूर्वतयारी होणे आवश्यक असते. पोलीस सुरक्षा, त्यासाठीची बैठक आणि पत्रकार परिषद होणे गरजचे आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

पुण्यात देखील ‘सनबर्न’ फेस्टिव्हलला मोठ्या प्रमाणावर विरोधाला सामोरे जावे लागले होते. कार्यक्रमाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणीस नकार दिल्याने ‘सनबर्न’चा मार्ग मोकळा झाला होता. पण फेस्टिव्हलच्या आयोजनानंतर आजोयकांवर दंड आकारण्यात आला होता. विनापरवाना डोंगराचे सपाटीकरण केल्याने, सनबर्न फेस्टिव्हलला तब्बल ६२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. हवेली तालुक्याच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी ही कारवाई केली होती. तसेच दंडाची रक्कम तातडीने भरण्याचे आदेशही ज्योती कदम यांनी दिले होते.