व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येत निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने यांचा सक्रिय सहभाग होता, असा दावा बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) न्यायालयात केला आहे. पुरावे गोळा करण्यासाठी त्यांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे एनआयएच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. त्यानुसार न्यायालयाने माने यांच्या पोलीस कोठडीत १ मेपर्यंत वाढ केली.

मनसुख यांची ४ मार्चला हत्या झाली. एनआयएने न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार ४ मार्चला वाझे यांनी आपला मोबाइल पोलीस आयुक्तालयात ठेवून ठाण्याच्या दिशेने प्रवास केला.

त्याच सुमारास माने यांनीही आपला मोबाइल बंद करून सहकाऱ्यांकरवी घरी पाठवत खासगी वाहनाने ठाणे गाठले. वाझे यांनी कळवा स्थानकात रुमाल विकत घेतल्यानंतर माने यांनी त्यांना खासगी वाहनाने गायमुख परिसरात आणले. माने यांनीच तावडे हे नाव सांगत मनसुख यांच्याशी संपर्क साधून घोडबंदर परिसरात बोलावले. हत्येनंतर मनसुख यांचा मोबाइल माने यांनी वसई परिसरात नेला. तेथे तो सुरू करून त्यांचे वसई परिसरात अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला.

वाझे यांना पाठदुखीचा त्रास असून कारागृहात गादी आणि खुर्ची उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलाने केली. ती न्यायालयाने फेटाळली.

तसेच वाझे यांच्या दातांवर उपचार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही वकिलाने केली, त्यावर कारागृह नियमांनुसार वाझे यांना उपचार पुरवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.