05 April 2020

News Flash

न्यायालयाचे आदेश धुडकावणे भोवणार

ठाणे पोलीस अधिकारी वाघ यांच्या चौकशीचे पोलीस महासंचालकांना आदेश

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ठाणे पोलीस अधिकारी वाघ यांच्या चौकशीचे पोलीस महासंचालकांना आदेश

आपण एका संवेदनशील प्रकरणाच्या तपासात गुंतलो आहोत, अशी सबब पुढे करत गेले वर्षभर हजर राहण्याचे न्यायालयाने वारंवार दिलेले आदेश धुडकावणे ठाणे पोलीस अधिकारी सुनील वाघ यांना भोवणार आहे. वाघ यांनी हजर न राहण्याबाबत पुढे केलेली सबब ही न्यायालयाची दिशाभूल करणारी आहे. उलट ते हेतुत: हजर झालेले नाहीत, असे नमूद करत उच्च न्यायालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना वाघ यांच्या चौकशीचे आदेश बुधवारी दिले.

चोरीच्या प्रकरणात वाघ हे तपास अधिकारी आहेत. त्यातील आरोपीने गेल्या वर्षी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे, परंतु जेव्हा जेव्हा याचिकेवर सुनावणी झाली, तेव्हा प्रत्येक वेळेस वाघ हे गैरहजर झाले. ते उपलब्ध होऊ न शकल्याने आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करणे कठीण होत आहे, अशी तक्रार अखेर सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली. त्यानंतर सुनावणीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून वाघ यांना वारंवार देण्यात आले. त्यावर हजर राहण्याऐवजी वाघ यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. आपण एका संवेदनशील प्रकरणाच्या तपासात गुंतलो असल्याने हजर राहू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी वाघ हे आजही हजर नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तसेच गेले वर्षभर याच कारणास्तव आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करता येऊ शकत नसल्याची हतबलताही व्यक्त केली. त्यानंतर न्यायालयाने ठाणे पोलिसांच्या कल्याण विभागात कार्यरत असलेल्या वाघ यांना आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाला पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाची दिशाभूल

दोघेही पुढील सुनावणीच्या वेळी हजर झाले नाही, तर ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश दिले जातील, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. एवढेच नव्हे, तर वाघ हे हेतुत: याचिकेवरील सुनावणीला हजर राहण्याचे टाळत असल्याचे दिसून येत आहे, असे नमूद करत न्यायालयाने पोलीस महासंचालकांना वाघ यांच्या चौकशीचे आदेश दिले. या वेळी वाघ यांनी प्रतिज्ञापाद्वारे पुढे केलेली सबब ही न्यायालयाची दिशाभूल करणारी आहे. ते आपली कायदेशीर जबाबदारी झटकत असल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2017 2:19 am

Web Title: sunil wagh bombay high court
Next Stories
1 आरोपीचा जबाब नोंदवण्यास पोलिसांना सक्त मनाई
2 नरिमन पॉइंट परिसरातील फेरीवाल्यांना नोटिसा
3 नालेसफाईला गती
Just Now!
X