मुंबई: भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील सनराइज रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये मृत्यू आणि जखमी झालेल्या रुग्णांकडून अनामत म्हणून घेतलेले लाखो रुपये अद्याप रुग्णालयाने परत केलेले नाहीत. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून पाठपुरावाही केला जात आहे. परंतु रुग्णालय प्रशासन मात्र प्रतिसाद देण्यास तयार नाही. त्यामुळे आता दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न नातेवाईकांपुढे निर्माण झाला आहे.

मॉलमध्ये असलेल्या सनराइज रुग्णालयाला २५ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारात आग लागली. यात ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७० रुग्णांना इतरत्र रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आले. मात्र रुग्णालयाने यातील एकाही रुग्णाच्या नातेवाईकाला अद्याप अनामत रक्कम परत दिलेली नाही.

‘माझ्या वडिलांना घटना घडण्याच्या दोन तास आधी म्हणजे रात्री दहा वाजता दाखल केले होते. मुलुंडच्या करोना केंद्रात ते होते. ऑक्सिजनची पातळी ८०च्या खाली गेल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवायचे होते. परंतु मुलुंडमध्ये कुठेही खाट मिळत नसल्याने आम्ही सनराइज रुग्णालयात आणले. त्यावेळी एक लाख रुपये भरल्याशिवाय दाखल करून घेणार नाही, असे रुग्णालयाने सांगितले. रात्रीच्या वेळी आम्ही धावपळ करून ते भरले. परंतु दोन तासांत ही घटना घडली आणि माझ्या वडिलांचा गुदमरून मृत्यू झाला. रुग्णालयाने एकावेळेस एवढी रक्कम भरण्याची जबरदस्ती केली. परंतु आता हे पैसे परत देण्याची वेळ आली तेव्हा हात वर करत आहे,’ असे मृत श्याम भगतानी (७०) यांची मुलगी हर्षां भाटिया यांनी सांगितले.

‘माझ्या वडिलांना आम्ही घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी रुग्णालयातून घरी आणणार होतो. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे उपचार करणारे डॉक्टर सांगत होते. परंतु रुग्णालय प्रशासनाने मात्र त्यांना अतिदक्षता विभागात विनाकारण ठेवले होते.

रुग्णालयात ५० हजार रुपये अनामत रक्कम भरली होती. मात्र यातील एकही रुपया रुग्णालयाने परत केलेला नाही किंवा त्याचा हिशेबही दिलेला नाही, अशी माहिती मृत राजेंद्र मुणगेकर (६६) यांचा मुलगा सागर मुणगेकर यांनी दिली.

याबाबत रुग्णालयाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी

घटना घडली त्याच दिवशी माझे वडील अशोक वाघमारे (६९) यांना नायर रुग्णालयात नीट उपचार मिळत नसल्याने येथे दाखल केले होते. अनामत म्हणून त्यांनी अधिक रक्कम मागितली होती. दहा हजार त्यावेळेस भरले. परंतु त्याच दिवशी रात्री लागलेल्या आगीत माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर न्यायालयात आमचे जबाब घेतले जात आहेत. परंतु पालिकेकडून कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. पोलिसांकडे आम्ही पाठपुरावा करतो, परंतु अजून चौकशी सुरू आहे असेच उत्तर दिले जाते. एकीकडे रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळेच आम्ही जवळच्यांना गमावले आणि दुसरीकडे पालिका, पोलीस प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे एक महिना उलटला तरी चौकशी झालेली नाही की, यातील गुन्हेगारांना अटक झालेली नाही. तेव्हा याप्रकरणी जलदगतीने तपास करून गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे, असे मत वाघमारे यांची मुलगी स्मिता वाघमारे यांनी व्यक्त केले.