News Flash

Sunrise Hospital Fire : रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट

रुग्णांना फोर्टिस, मुलुंड करोना, राजावाडी अशा अनेक ठिकाणी दाखल केल्याचे समजले.

मुंबई : सनराईज रुग्णालयात आगीची घटना समजल्यानंतर त्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र नातेवाईकांना कोणत्या रुग्णालयात पाठविले याची माहिती नावासह एकाच ठिकाणी उपलब्ध न केल्यामुळे रुग्णांना शोधण्यासाठी नातेवाईकांना रुग्णालयांच्या पायऱ्या झिजविण्याची वेळ आली.

माझे वडील हरीश सचदेव (६०) यांना गुरुवारी दुपारी सनराईज रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करून आम्ही घरी परतलो. सकाळी टीव्हीवर पाहिल्यावर आग लागल्याचे समजले. आम्ही रुग्णालय गाठले. तोपर्यंत येथे सर्व जळून गेले होते. रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठविले एवढेच सांगितले. पण कोणत्या रुग्णांना कोणत्या रुग्णालयात पाठविले याची काहीच माहिती दिली जात नव्हती. काही जणांना मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयात नेल्याचे सांगितले. मग आम्ही येथे आलो, तर त्यांचा मृतदेहच पाहायला मिळाला, असे त्यांचा २० वर्षांचा मुलगा किरण सचदेव याने सांगितले.

आम्हाला सकाळी सहाला समजल्यावर तेथे पोहोचलो, मात्र कोणीच नीट माहिती देत नव्हते. रुग्णांना फोर्टिस, मुलुंड करोना, राजावाडी अशा अनेक ठिकाणी दाखल केल्याचे समजले. त्यामुळे अक्षरश: आम्ही लो. टिळक रुग्णालय, राजावाडी, मुलुंड करोना अशा अनेक रुग्णालयांमध्ये फिरलो. शेवटी या रुग्णालयाचे नाव एकाने सांगितले. म्हणून येथे दुपारी १२च्या सुमारास पोहोचलो. तेव्हा इथे चार मृतदेह दाखविले. चेहरा धुराने पूर्ण काळा झाला होता. कपडय़ांवरून माझे सासरे असल्याचे समजले. रुग्ण जिवंत आहे की मृत हेदेखील माहीत नाही, अशा मानसिक स्थितीमध्ये नातेवाईकांना रुग्णालये फिरायला लावणे कितपत योग्य आहे. एकाच ठिकाणी माहिती मिळाली असती तर सर्वाना इतका त्रास झाला नसता, असे मत मृत श्याम भगतानी (७०) यांचे जावई प्रेम भाटिया यांनी व्यक्त केले.

माझे नातेवाईक अशोक वाघमारे यांच्यावर अतिदक्षता विभागात रुग्णालयात उपचार सुरू होते. सकाळी घटना समजल्यावर आम्ही रुग्णालयाच्या ठिकाणी पण तेथे काहीच माहिती मिळाली नाही म्हणून आता प्रत्येक रुग्णालय शोधत आहोत. दुपारचे तीन वाजले तरी काहीच पत्ता लागलेला नाही, असे नातेवाईक दिशिता अशर हीने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:31 am

Web Title: sunrise hospital fire relatives face difficulties to find patients zws 70
Next Stories
1 आगीत १२ करोना रुग्णांचा मृत्यू
2 राज्यात उद्यापासून रात्रीची जमावबंदी
3 ‘वेळ चुकली असती तर..’
Just Now!
X