कोटय़वधी रुपये खर्चून अमरावती येथे तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या शासनाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची अवस्था दयनीय असल्याचे चित्र समोर आले आहे. रुग्णालयातील उपकरणांचा वापर क्षमतेने होत नसल्याचे आढळून आले आहे. येथील डॉक्टर ‘अर्थपूर्ण’ कारणांसाठी गायब असतात तर सीटी स्कॅन व एमआरआय मशीनचा पत्ताच नसल्याचे शिवसेनेचे आमदार डॉ. दीपक सावंत यांनी केलेल्या पाहणीत आढळून आहे.गंभीर बाब म्हणजे या रुग्णालयात ‘राजीव गांधी जीवनदायी योजना’ बंद असल्याचे डॉ. सावंत यांचे म्हणणे आहे.
आदिवासी भागातील लोकांना व ग्रामीण भागासाठी सुरु करण्यात आलेल्या या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डॉक्टर व उपकरणांची वानवा आढळून आली आहे. डॉ. सावंत यांनी रुग्णालयाला नऊ फेब्रुवारी रोजी भेट दिली. त्यावेळी तेथे एकही रुग्ण दाखल झाला नसल्याचे तसेच आवारात डुकरे फिरत असल्याचे त्यांना आढळून आले.
सहा डायलिसीस युनिट असतानाही केवळ दोन-तीन रुग्णांवरच तेथे उपचार केले जातात. याचाच अर्थ संपूर्ण क्षमतेने डायलिसीस मशिनचा वापर केला जात नाही. यातील गंभीर बाब म्हणजे डायलिसीससाठीचा जो प्रोटोकॉल डॉक्टरांनी पाळणे आवश्यक आहे, तो पाळला जात नसल्याची तक्रार आमदार सावंत यांनी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव टि. सी. बेंजामीन यांच्याकडे केली आहे.