गेल्या तीन वर्षांमध्ये भांडुप येथे सुरपस्पेशालिटी रुग्णालयाची एक वीटही उभारण्यात पालिका अपयशी ठरल्यामुळे दोन लाख चौरस फुटापैकी ८० हजार चौरस फूट जागा विकासकाला परत करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे. त्यामुळे भांडुपमध्ये उभारण्यात येणारे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे स्वप्न भंग होण्याची चिन्हे आहेत.
भांडूप येथील सोनापूर परिसरात विकासकाकडून पालिकेला दोन लाख चौरस फूट क्षेत्रफळाचा भूखंड मिळाला होता. पूर्व उपनगरातील रहिवाशांसाठी या भूखंडावर सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा मानस पालिकेने तीन वर्षांपूर्वी व्यक्त केला होता.
या रुग्णालयासाठी तब्बल १५० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. तसेच तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्तीही करण्यात आली होती. मात्र हा भूखंडावरील ८० हजार चौरस फूट जागा परत मिळविण्यासाठी संबंधित विकासकाने न्यायालयात धाव घेतली होती.
तीन वर्षांमध्ये रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवात करण्यास पालिका असमर्थ ठरल्यामुळे न्यायालयाने ८० हजार चौरस फूट जागा विकासकाला देण्याचे आदेश दिले.
त्यामुळे उर्वरित भूखंडावर अद्यायावत सुविधांनी युक्त असे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे स्वप्न भंग पावण्याची चिन्हे आहेत.
निधीची तरतूद करुनही वेळीच या रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवात करण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाबद्दल आरोग्य समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणी पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी आणि पूर्व उपनगरातील रुग्णांना दिलासा मिळू शकणारे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी दाद मागावी. त्यासाठी नामांकीत वकीलांची मदत घ्यावी, असेही ते म्हणाले.

पालिकेच्या ताब्यात असलेल्या १.२० लाख चौरस फूट क्षेत्रफळावर सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे राहू शकणार नाही. रुग्णालयाच्या बाबतीत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी.
-रुपेश वायंगणकर,
मनसेचे नगरसेवक