06 August 2020

News Flash

करोना रुग्णालयांच्या कारभारावर देखरेख

..आता जिल्हास्तरीय समितीद्वारे उपचार आणि सुविधांचा नियमित आढावा

संग्रहित छायाचित्र

 

करोनाबाधितांवर होणारे उपचार, रुग्णालयातील आरोग्य सुविधा यांवर देखरेख ठेवण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाने करोना रुग्णालयांमध्ये ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवावेत, रुग्णालयांच्या भेटीदरम्यान समितीला सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध करून द्यावे, तसेच रुग्णालयांत मदत कक्ष तयार करून रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे आप्ताची विचारपूस करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

करोना रुग्णांची काळजी व्यवस्थित घेतली जावी; त्यांना मिळणारे उपचार, रुग्णालयांमधील सुविधा या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्यात मुंबई वगळता अन्यत्र सर्व जिल्ह्य़ांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

समितीत जिल्हा शल्यचिकित्सक सदस्य सचिव असतील. त्या-त्या जिल्ह्य़ातील महापालिका आयुक्त हे समिती सदस्य असून जिल्ह्य़ातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी किंवा हृदयविकारतज्ज्ञ किंवा त्या जिल्ह्य़ात उपलब्ध असलेले जागतिक आरोग्य संघटनेचे क्षयरोग सल्लागार, नंदुरबार, उस्मानाबाद, वाशीम, गडचिरोली या चार जिल्ह्य़ांतील युनिसेफचे सदस्य, जिल्ह्य़ातील शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील सामान्य औषधी विभागाचे प्रमुख, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र समिती

मुंबई महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र समिती असून महापालिका आयुक्त समितीचे अध्यक्ष तर मुंबई महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. १२ जणांच्या समितीत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक, जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता व सामान्य औषधी विभागप्रमुख, सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता व सामान्य औषधी विभागप्रमुख, टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता व सामान्य औषधी विभागप्रमुख, एच.बी.टी. वैद्यकीय महाविद्यालय आणि कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता व सामान्य औषधी विभागप्रमुख, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व सामान्य औषधी विभागप्रमुख व जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी (एकूण ५) यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुंबईत करोना रुग्णालयांची संख्या पाहता महापालिका आयुक्त वैद्यकीय आवश्यकता भासल्यास महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमू शकतात.

काम काय?

करोना रुग्णालयांना भेटी देऊन तेथील सुविधेची पाहणी करणे, भेटीदरम्यान समिती सदस्य विलगीकरण कक्ष, आयसीयू कक्षांना भेटी देऊन रुग्णाला देण्यात येत असलेल्या उपचाराची माहिती घेऊन कागदपत्रांची पाहणी करणे. अचानक भेटी देण्याचेही समितीला निर्देश आहेत. समिती नियमितपणे मुख्य सचिवांना त्यांचा कार्य अहवाल पाठवेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:38 am

Web Title: supervision of the management of corona hospitals abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 महिला कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी!
2 शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना १० जुलैपर्यंत मोफत तांदूळ वाटप
3 राज्याच्या आरोग्य भवनातील ३५ जण करोनाबाधित
Just Now!
X