परीक्षा पारदर्शी होणार नसल्याचा शिक्षकांचा दावा

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी ५ मे रोजी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी या परीक्षेसाठी यंदा शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात येणार आहे. मात्र यात विज्ञान शाखेच्या शिक्षकांचीही नियुक्ती करण्यात आल्याने ही परीक्षा पारदर्शी होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

ज्या विषयाची परीक्षा असेल त्या विषयाच्या शिक्षकांना पर्यवेक्षणाची जबाबदारी दिली जाऊ नये हा नियम राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना वापरला जातो. तोच नियम याही परीक्षेला लागू व्हावा जेणेकरून परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडणार नाही. या परीक्षेस जर विज्ञान शाखेतील परीक्षकांना पर्यवेक्षणाची जबाबदारी दिली तर परीक्षेत गैरव्यवहार होऊ शकतील अशी भीती राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे. यामुळे विज्ञान शिक्षकांना या पर्यवेक्षणाच्या कामातून वगळावे असेही देशमुख यांनी नमूद केले. यापूर्वी हे काम महसूल विभागाकडे होते. तेथील कर्मचारी पर्यवेक्षणाचे काम करीत होते. यंदा हे काम शिक्षकांना दिले जाणार आहे. हा निर्णय योग्य असल्याचे सांगत देशमुख यांनी विज्ञान शिक्षकांऐवजी कला आणि वाणिज्य शाखेच्या शिक्षकांना हे काम द्यावे अशी मागणी केली. या संदर्भात शिक्षणमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला जाणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.