मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुढील आठवडय़ात पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘सीबीआय’तर्फे, तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणीही पुढील आठवडय़ातच पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती राज्याच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारी उच्च न्यायालयात दिली.

दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर १३ फेब्रुवारीला पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयाला दिली. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी नव्याने अटक केलेल्या आणखी तीन आरोपींविरोधात १२ फेब्रुवारीला आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड्. अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर फरारी आरोपींचा छडा लावण्यावर पूर्णत: लक्ष केंद्रित करण्यात येईल, असा दावाही मुंदरगी यांनी या वेळी केली.

 

सीबीआयने प्रतिष्ठा जपावी – न्यायालय 

पश्चिम बंगालमधील नाटय़मय परिस्थितीचा दाखला देत न्यायालय म्हणाले की, ‘सीबीआय’सारख्या देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेने स्वत:ची प्रतिष्ठा जपण्याची गरज आहे. खूप साऱ्या प्रकरणांचा तपास सीबीआय करत आहेत. या प्रकरणांकडे सगळ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. समाजमाध्यमे त्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे देशातील सर्वोच्च यंत्रणेने स्वत:ची प्रतिष्ठा जपण्याची गरज आहे, असा सल्ला न्यायालयाने दिला.