वाहन मिळत नसल्याची सबब; रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद

समीर कर्णुक, मुंबई :

सोयीसुविधांच्या अभावामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात पुन्हा एकदा रुग्णांची गैरसोय होऊ लागली आहे. गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयातील दूधपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे रुग्णांना दूध मिळणेच बंद झाले आहे.

पूर्व उपनगरांत शताब्दी हे पालिकेचे एकमेव मोठे रुग्णालय आहे. शीव, केईएम, नायर या मुख्य रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी उपनगरीय रुग्णालये विकसित करण्याचा संकल्प पालिकेने केला असला तरी गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात मात्र रुग्णांची वारंवार गैरसोय होते.

रुग्णांना सकाळी आणि संध्याकाळी एक ग्लास दूध दिले जाते. पालिकेच्या सर्वच रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध असून राज्य सरकारमार्फतच हा दूधपुरवठा केला जातो. पूर्वी या रुग्णालयात ५० लिटर दूध पाठवले जात होते. त्यानंतर तो ३० लिटरवर आणण्यात आला. त्यामुळे रुग्णांना सकाळी एकदाच तेही अर्धा ग्लास दूध दिले जात असल्याची माहिती एका रुग्णाने दिली. त्यामुळ रुग्णालयाचे कर्मचारीच दूध फस्त करत असल्याचा आरोप रुग्णांकडून केला जात असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. १ जानेवारीपासून मात्र रुग्णालयाचा दूधपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे रुग्णांना एकवेळ मिळणारे दूधदेखील बंद झाले आहे. परिणामी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून दूध आणावे लागते. याचा मोठा फटका प्रसूतिगृहातील महिलांना आणि बालरुग्णांना बसत आहे.

सरकारने तात्काळ येथील दूधपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. वाहन मिळत नसल्याने दूधपुरवठा बंद असून येत्या दोन ते तीन दिवसांत तो सुरळीत केला जाईल, अशी माहिती दूधपुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली.

दूधपुरवठा करणाऱ्या संबंधित व्यक्तींशी याबाबत पत्रव्यवहार झाला आहे. काही दिवसांतच दूधपुरवठा पूर्ववत करणार असल्याचे या यंत्रणेने कळविले आहे.

– डॉ. अलका माने, मुख्य वैद्यकीय अधिकारी, शताब्दी रुग्णालय