पदाधिकारी आणि नातेवाईकांनाच इंजेक्शन; काँग्रेसच्या आरोपामुळे खळबळ

ठाणे : जिल्ह्यात सर्वत्र रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला असून आजही रुग्णालयांना मागणीपेक्षा कमी प्रमाणात रेमडेसिविर उपलब्ध होत आहेत. असे असतानाही शिवसेनेच्या शाखेतून रेमडेसिविरचा पुरवठा केला जात असून तो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांनाच उपलब्ध करून दिला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांनी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तसेच लसीकरणातही शिवसेनेकडून गोंधळ सुरू असल्याचाही आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार असून त्यातील काँग्रेसनेच मित्र पक्ष असलेल्या ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, मनोज शिंदे यांचा गैरसमज झाला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

ठाण्यात आजही अनेक खाजगी रुग्णालयांतील रुग्णांना रेमडेसिविर या इंजेक्शनची गरज भासत आहे. परंतु खाजगी रुग्णालयांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी केल्यानंतर तो साठा उपलब्ध होत आहे. एकीकडे रेमडेसिविरचा तुटवडा असल्याचे दिसत असले तरी दुसरीकडे शिवसेनेच्या शाखांमधून रेमडेसिविर उपलब्ध होत असून त्यांच्याकडे हा साठा कसा उपलब्ध होत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यातही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांनाच ते उपलब्ध करून दिले जात असल्याचा आरोपही करत शिवसेनेकडून अशा प्रकारे भेदभाव करणे अयोग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केवळ शिवसेनेच्या शाखेतून रेमडेसिविरचा पुरवठा करण्यापेक्षा सर्व पक्षीय कार्यालयातून त्याचा साठा उपलब्ध करून दिला तर, गरजू रुग्णांना ते उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचण्यास मदत होईल. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून सर्व पक्षांच्या कार्यालयात रेमडेसिविरचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सध्या लसीकरणावरूनही अनेक केंद्रावर गोंधळ सुरू आहे. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना लस मिळत नसून त्याऐवजी केंद्राच्या भागात वर्चस्व असलेला पक्ष दुसऱ्यांनाच लस देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यातून लसीकरणाचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्या ठिकाणी प्रशासनाची यंत्रणा कामाला लावली तर सर्वांना योग्य पद्धतीने लस उपलब्ध होऊ  शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. मुंबई तसेच इतर महापालिका स्मशानभूमीत लाकडांसाठी पैसे आकारत नाही. परंतु ठाणे महापालिकेकडून लाकडांसाठी पैसे आकारत आहे. आधीच नागरिकांची परिस्थिती करोनामुळे मेटाकुटीला आलेली आहे. त्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी लाकडे मोफत उपलब्ध करून देण्यात यावी आणि यामध्ये  महापौरांनी लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टाळेबंदीच्या काळात शिवसेना शाखांमधून गोरगरीब नागरिकांना अन्नधान्याची मदत केली जात आहे. त्याचबरोबर रुग्णांना इतर औषधे आणि रुग्णवाहिकेची मदत करण्याबरोबरच वैद्यकीय मार्गदर्शनही केले जात आहे. त्यामुळे कदाचित शिवसेना शाखांमधून रेमडेसिविरचा पुरवठा होत असल्याबाबत मनोज शिंदे यांचा गैरसमज झाला असून त्यांचा गैरसमज दूर केला जाईल. – नरेश म्हस्के, महापौर, ठाणे