करोना लशींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर राज्यांच्या लसीकरणाच्या वेगावर अवलंबून असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांनाच एक कोटीहून अधिक लशीच्या मात्रा मिळाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान असून राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. महाराष्ट्राला ६ एप्रिलपर्यंत एक कोटी सहा लाख लसमात्रा मिळाल्या. त्यापैकी ९१ लाख मात्रा वापरल्या. म्हणजे १५ लाख मात्रा शिल्लक आहेत. मग, आज जाणीवपूर्वक केंद्र बंद करून लशींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय, असा सवाल फडणवीस यांनी केला.

ज्या राज्यांना आज कोटा दिला आहे, तितक्या लसमात्रा पुरवठ्याच्या मार्गात आहेत. तो पुरवठा ९ ते १२ एप्रिल या काळात होईल. यात महाराष्ट्राला पुन्हा अधिकच्या १९ लाख मात्रा मिळणार आहेत.

उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य आहे. त्यांना ९२ लाख मात्रा मिळाल्या आहेत. त्यांनी ८३ लाख मात्रा वापरल्या आहेत आणि नऊ लाख मात्रा त्यांच्याकडे शिल्लक आहेत. हरयाणाला पहिल्या पुरवठ्यामध्ये फारशा मात्रा मिळाल्या नव्हत्या त्या आता दिल्या जात आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

शरद पवार यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली व त्यांना संपूर्ण वस्तुस्थिती आरोग्यमंत्र्यांनी सांगितली आहे. मी  केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोललो आहे व त्यांनी पुरेशा प्रमाणात लसपुरवठा करण्याचे आणि महाराष्ट्राशी भेदभाव होणार नाही असे आश्वाासन दिले आहे.केंद्राने करोनाविरोधात  महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली आहे, असे फडणवीस म्हणाले.

राज्यातील करोना आणि लसीकरण हे महत्त्वाचे प्रश्न आहेतच. परंतु त्यासोबतच सरकारच्या गैरकारभारावर होत असलेली टीका आणि विविध प्रकरणात न्यायालयात निघत असलेले वाभाडे यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राज्य सरकारने लशीवर राजकारण करू  नये. -देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते