‘आपलं माणूस अचानक निघून गेल्यानंतर बसणारा धक्का मोठा असतो, हे मी स्वत: अनुभवलंय. माझ्यासारख्या अनेकांनी त्यांच्या जवळची व्यक्ती करोनाच्या महासाथीत गमावली. अशा कुटुंबांसाठी गरज आहे ती आधार गटाची’, मुलुंडच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या पालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रजनी जगताप आधार गटाची संकल्पना सांगत होत्या.

डॉ. जगताप स्वत: करोनाच्या दाढेतून सुखरूप परतल्या. मात्र, त्यांचे पती डॉ. श्रीधर जगताप यांचा करोनाने मृत्यू झाला. डॉ. रजनी आणि डॉ. श्रीधर मिठागरच्या करोना दक्षता केंद्राची जबाबदारी सांभाळत होते. डॉ. श्रीधर दोन वर्षांपूर्वी शताब्दी रुग्णालयातून वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. करोनाकाळात रुग्णांना उपचार मिळायला हवेत म्हणून डॉ. श्रीधर यांनी पुन्हा रुग्णसेवा सुरू केली होती. ७ जुलैला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. डॉ. रजनी यांनी आता दुसऱ्याच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी काही सहकाऱ्यांच्या मदतीने आधार गट स्थापण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

झाले जरा मागेपुढे तरिही तिथे भेटू पुन्हा..

डॉ. रजनी डॉ. श्रीधर यांच्या आठवणी सांगत होत्या. ‘मिठागरच्या करोना केंद्रात सुरवातीच्या दिवसांमध्ये दाखल होण्यापूर्वी रुग्णांची काहीच तयारी नसे. तेव्हा ब्रश, साबण या गोष्टी त्यांना देण्याचे आम्ही ठरवले. त्यावेळी श्रीधर आणि मी मोठय़ा प्रमाणात सामान आणले. ते कागदी पिशव्यांमध्ये भरून त्यांच्यावर एक ‘स्माईल’ काढून आम्ही रुग्णांना दिले.  या किटला ‘स्माईली किट’ असे नाव पडले. मी खूप थकलेली असल्यास अनेकदा ते स्वत औषधे देत.. श्रीधर आणि मी पालिकेतच २३ वर्षांपूर्वी भेटलो होतो. कदाचित आमचे सहजीवन इथपर्यंतच होते..’, असे डॉ. रजनी जेव्हा सांगतात, तेव्हा ‘झाले जरा मागेपुढे तरिही तिथे भेटू पुन्हा’ या विंदांच्या पंक्ती आठवतात.