प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या सहकारी आमदारासह शिवसेनेला पािठबा जाहीर केल्याने शिवसेनेचे संख्याबळ आता ६० वर पोहोचले आहे. कडू यांनी रविवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.

शेतातील पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोहयोमधून करणे, दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी आणि अचलपूर व मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मुद्दय़ांवर पाठिंबा दिल्याचे कडू यांनी सांगितले.  आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या, अपंग बांधवांच्या प्रश्नांवर प्रहार आणि शिवसेनेची वैचारिक भूमिका समान असल्याने शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीच पक्षाने तिकीट नाकारल्याने बंडखोरी करीत अपक्ष म्हणून रामटेकमधून निवडणूक लढविणारे आशीष जयस्वाल यांच्यासह अन्य एका अपक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे नाशिक पूर्व  मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविलेले आणि पराभूत झालेले बाळासाहेब सानप यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

गडाख पिता-पुत्रांशी पवारांची चर्चा

श्रीरामपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी खासदार यशवंतराव गडाख व नवनिर्वाचित आमदार शंकर गडाख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.  अपक्ष  शंकर गडाख यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले होते. निवडणुकीनंतर शिवसेना व भाजप नेते हे गडाख यांच्या संपर्कात होते.