आरेमधील मेट्रो ३ च्या कारशेडसाठी झाडे तोडण्याच्या विरोधात निदर्शने सुरू असताना आता कारशेडला समर्थन देणारेदेखील सरसावले आहेत. पर्यावरणवाद्यांशी चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा सर्वसामान्य प्रवाशांचे म्हणणेदेखील ऐकून घ्यावे, सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाचा विचार करणे गरजेचे आहे, अशा आशयाचे निवेदनच काही संस्थांनी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला दिले.

शुक्रवारी कारशेडच्या विरोधात आणि समर्थनासाठी अशी दोन आंदोलने एकाच दिवशी घडली. यावेळी कारशेडला समर्थन दर्शविणाऱ्यांनी एमएमआरसीएलला विविध मागण्यांचे निवेदन दिले. पर्यावरणाचाच विचार करायचा असेल तर मुंबईतील प्रत्येक बांधकामाला दिलेल्या परवानगीची पुन्हा चौकशी करावी लागेल, अशी भूमिका कारशेड समर्थकांनी घेतली. जागृत भारत मंच या संस्थेच्या समर्थकांनी पर्यावरणस्नेही मेट्रो वाचवण्याची गरज मांडणारे फलक झळकवले. मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतुकीचा चांगला पर्याय तयार होत असून, त्याचा बळी जाऊ नये अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. काही रेल्वे प्रवासी संघटनांचादेखील यामध्ये सहभाग होता. रेल्वे प्रवाशांचे मतदेखील विचारात घ्यायला हवे, सार्वजनिक प्रकल्पांना होणाऱ्या विरोधात प्रकल्पाचा खर्च खूपच वाढतो, असेदेखील या निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, कारशेडविरोधात रविवारी आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचा समावेश आहे.

समाजमाध्यमांवर आरोप-प्रत्यारोपांना ऊत

कारशेडसाठी २६४८ झाडे हटवण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणात मंजूर झाल्यानंतर गेल्या १५ दिवसांत समाजमाध्यमांवर कारशेड विरोधक आणि समर्थक अशी विभागणी झाली आहे. एमएमआरसीएलकडून मांडल्या जाणाऱ्या अनेक बाबींवर आरोप-प्रत्यारोपाचे प्रकार वाढले आहेत.