राज्यातील वैद्यकीयला जाऊ इच्छिणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ ची सक्ती यंदाच्या वर्षी केली जाऊ नये, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शुक्रवारी लोकसभेत केली. तर भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना निवेदन देऊन राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची विनंती केली आहे.
राज्य सरकारच्या प्रवेशपरीक्षेची तयारी करीत असताना अचानकपणे नीटची सक्ती विद्यार्थ्यांवर केल्याने त्यांना धक्काच बसला असल्याचे सांगून खासदार सावंत यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना त्यातून वगळण्यासाठी केंद्राने पावले टाकावीत, अशी विनंती केली.
राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम आणि सीबीएसईचा अभ्यासक्रम समकक्ष नसल्याने नीटची सक्ती केल्यास राज्य मंडळाच्या लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे.
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ही परीक्षा घेतली जात असली तरीही राज्य मंडळाचा अभ्यासक्रम समकक्ष करण्यासाठी दोन वर्षांचा अवधी मिळाला पाहिजे. त्यांना अचानकपणे नवीन परीक्षेला तोंड देण्याची सक्ती केली जाऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयास विनंती करण्याची मागणी सावंत यांनी लोकसभेत केली.
खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना पत्र पाठवून यंदाच्या वर्षी या परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सवलत देण्याची विनंती केली आहे.
विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या सक्तीमुळे मोठा मनस्ताप होणार असून एवढय़ा कमी कालावधीत परीक्षेची तयारी करणे विद्यार्थ्यांना शक्य होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.