शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होऊ देण्याच्या मागणीसाठी यंदा शिवसेनेच्या आधी सरकारनेच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सरकारच्या या मागणीला न्यायालय हिरवा कंदील दाखवणार की नाही याचा निर्णय शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.
शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असून ते शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. ‘वीकॉम ट्रस्ट’ने केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे. त्यामुळे तेथे खेळाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कार्यक्रमासाठी न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्या पाश्र्वभूमीवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेतर्फे दरवर्षी अर्ज केला जातो. गेल्या वर्षी न्यायालयाने शिवसेनेला परवानगी नाकारली होती. यंदा मात्र शिवसेनेऐवजी सरकारनेच न्यायालयात धाव घेत सेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी देण्याची मागणी केली आहे. शिवाजी पार्कवर खेळाव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांसाठी राखून ठेवलेल्या दिवसांमध्ये दसरा मेळाव्याचा समावेश करण्यासाठी सरकार आणि पालिकेने अनुकूलता दाखवली आहे. त्याच पाश्र्वभूमीवर सरकारने दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी न्यायालयात याचिका केली आहे. त्यामुळे न्यायालय सरकारच्या या मागणीला हिरवा कंदील दाखवणार की नाही याचा शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.