सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्री पुन्हा लक्ष्य

पक्षाचा घसरता आलेख लक्षात घेता शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांची सनद शनिवारी सरकारला सादर केली. विशेष म्हणजे दुसऱ्या शनिवारची सुट्टी असतानाही राष्ट्रवादीचे निवेदन स्वीकारण्याकरिता कृषी खात्याचे सचिव मंत्रालयात उपस्थित होते.

पक्षाच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची सनद तयार केली आहे. कर्जमाफी, हमीभाव अशा विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे. शासकीय सुट्टी असली तरी ही सनद स्वीकारण्यासाठी मंत्रालयात उपस्थित राहावे अशी विनंती पक्षाच्या वतीने मुख्य सचिवांना करण्यात आली होती. मुख्य सचिव उपस्थित नव्हते, पण त्यांच्या आदेशावरून कृषी खात्याचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी राष्ट्रवादीची सनद खासदार सुप्रिया सुळे व मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्याकडून स्वीकारली. या वेळी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार हेमंत टकले आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या किंवा त्यांना फूस देणाऱ्या नेत्यांच्या कुंडल्या आपल्याकडे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देता येत नसल्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देऊन ज्योतीष्यशास्त्राचा पूर्णवेळ अभ्यास करावा, असा उपरोधिक सल्लाही सुप्रियाताईंनी मुख्यमंत्र्यांना दिला. नळावरच्या बायकांप्रमाणे मुख्यमंत्री वसावसा भांडतात, अशी टीका सुप्रिया यांनी केली होती.