बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना अखेर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात बंद असलेले छगन भुजबळ यांचा तुरुंगातून पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ते तुरुंगातून येण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देर आए दुरुस्त आए अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांना जामीन मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना देर आए दुरुस्त आए, भगवान के घर देर है अंधेर नहीं, छगन भुजबळांना न्याय मिळाला असं म्हटलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी भुजबळांना जामीन मिळाल्याचा आनंद, पण आरोप सिद्ध न होता एखाद्याला जेलमध्ये राहावं लागतं याची खंत असल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून (ईडी) १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. भुजबळ यांची मुंबईतील ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरू होती. छगन भुजबळ यांनी आपण चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते मात्र, सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता.

जामीन मिळणं हा त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. आमचे नेते भुजबळ यांच्या संपर्कात होते असे ते म्हणाले. सरकारनं त्यांना जामीन मिळू नये असा खूप प्रयत्न केल्याचे सांगताना अखेर कायद्यानुसार त्यांना जामीन मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भुजबळांसह १७ जणांवर आरोपपत्र

महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स या व्यवहारातून भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या ८७० कोटी रुपयांबाबत महासंचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. छगन भुजबळांसह त्यांचा मुलगा पंकज आणि समीर यांच्यासह १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.