अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सूरज पांचोलीने जामीनासाठी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा असलेल्या सूरजचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने गेल्या आठवड्यात फेटाळला होता. त्यामुळे त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच जामीनासाठी याचिका दाखल केली. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सूरजला अटक केली आहे. 
तीन जून रोजी जिया खानने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. जियासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याची कबुली सूरजने पोलिसांनी दिलीये. जियाने आत्महत्या करण्यापूर्वी ती आपल्या मोबाईलवरून सूरजशी बोलली होती. त्यानंतर सूरजने तिला एसएमएसही पाठवले होते. सरकारी वकिलांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यामुळे सत्र न्यायालयाने सूरजचा जामीन अर्ज फेटाळला होता. जियाने लिहिलेले एक पत्रही पोलिसांना तिच्या घरी मिळाले होते. या पत्रामध्ये तिने गर्भपात केल्याचा उल्लेख आहे. या पत्रामध्ये सूरजच्या नावाचा उल्लेख नसला, तरी ते तिने सूरजलाच लिहिले होते, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.