परिश्रम, चिकाटी, धर्य आणि जगण्याची दुर्दम्य उमेद हा रोजच्या जगण्याचा मूलमंत्र असलेल्या सुरेखाला ‘लोकसत्ता’च्या एका वाचकाने थेट परदेशातून मदत पाठवली आहे. अलोककुमार अक्से असे या वाचकाचे नाव असून मनिग्रामद्वारे त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच यापुढेही तिला दर महिन्याला काही रक्कम पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
लहान वयात वडिलांचा आधार हरपल्यानंतर केवळ आपल्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी सुरेखाने भुसावळच्या एका छोटय़ा खेडय़ातून मायानगरीत पुरुषांच्या व्यवसायात उडी घेतली. मात्र तिचा संघर्ष इतक्यातच थांबला नाही. वडिलांच्या अचानक जाण्याने भ्रमिष्ट झालेल्या आईच्या औषधांचा खर्च आणि स्वत:च्या शिक्षणासाठी डोळ्यात असणारे स्वप्न.. तिचा रोजच्या जगण्याचा संघर्ष, यावर प्रकाश टाकणारे वृत्त ‘मुंबई वृत्तांत’ने २ जानेवारीला प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची दखल घेऊन मूळचे औरंगाबादचे असलेले आणि सध्या अमेरिकेत व्यवसाय करीत असलेले अलोककुमार यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात संपर्क साधला. आणि केवळ मदत करू इच्छितो असे आश्वासन न देता काही तासांत त्यांनी मदत पाठवली. याशिवाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कन्या विजयाताई भोगले-पाटील यांनीही सुरेखाच्या शिक्षणाचा खर्च तसेच तिला काही आíथक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. ‘लोकसत्ता’च्या अनेक सहृदय वाचकांसह, राजकीय कार्यकत्रे आणि राज्य सरकारच्या काही विभागांतून सुरेखाला मदतीचे आश्वासन दिले जात आहे.