शहरी नक्षलवाद प्रकरण
मुंबई : शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते सुरेंद्र गडलिंग यांनी आईच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त धार्मिक विधी पार पाडण्यासाठी तात्पुरत्या जामिनाची मागणी केली आहे.

आईचा १५ ऑगस्टला पहिला स्मृतीदिन आहे. आईचे निधन झाले त्यावेळी आपण कारागृहात होतो. शिवाय आपल्या भावाला सध्या करोनाचा संसर्ग झाला असून तो विलगीकरणात आहे. त्यामुळे आईच्या पहिल्या स्मृतीदिनी तिचे शेवटचे धार्मिक विधी आपण पार पाडावे, अशी आपल्या कुटुंबियांची इच्छा आहे. म्हणून आपल्याला तात्पुरता जामीन मंजूर करावा, अशी मागणी गडलिंग यांनी केली आहे.

गडलिंग यांच्या याचिकेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विरोध केला. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठानेही एनआयएला याचिकेवर उत्तर दाखल  करण्याची संधी द्यायला हवी असे  स्पष्ट करत गडलिंग यांच्या याचिकेवरील सुनावणी  २६ जुलैला ठेवली. गडलिंगला ६ जून २०१८ रोजी अटक केली  होती. तेव्हापासून ते कारागृहातच आहेत.