रेल्वेमंत्र्यांची घोषणा; भाजपचे मी मुंबई अभियान

‘भाजप सरकारने केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली विकासाचा ध्यास घेऊन कामे करण्यास सुरुवात केली आहे. सुदैवाने मुंबईकरांसमोरही एक संधी चालून आली आहे. मुंबईचा विकास करायचा असेल, तर मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकवा..’ हे आवाहन भाजपच्या कोणत्याही स्थानिक पातळीवरील नेत्याचे नसून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे आहे. येत्या काळात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकीक स्मारक उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई भाजपच्या ‘मी मुंबई’ या अभियानाची सुरुवात शुक्रवारी दादर येथील वैद्य सभागृहात झालेल्या मेळाव्यात करण्यात आली. या वेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा सत्कारही करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मुंबई भाजपच्या ‘मिशन महापालिके’ला रेल्वेमंत्र्यांनी आपल्या आवाहनाचे इंजिन जोडले. या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, आमदार सरदार तारासिंग, भाई गिरकर, मनिषा चौधरी, योगेश सागर, आर. एन. सिंह, राज पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना त्याचीच तयारी म्हणून भाजपने विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘मी मुंबई’ हे नवीन अभियान आहे. या अभियानाची सुरुवात रेल्वेने मुंबईत केलेल्या कामांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यापासून झाली. या अभियानाद्वारे केंद्र तसेच राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती मुंबईकरांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या कारकिर्दीत मुंबईत केलेल्या कामांचा आढावा घेतला. मुंबईसाठी एमयुटीपी-३ला मंजुरी, उन्नत रेल्वेमार्गाच्या कामाची पायाभरणी, आदी विविध कामे लवकरच सुरू होणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.