27 May 2020

News Flash

‘क्लस्टर कंटेनमेंट’ कृती योजनेंतर्गत सव्वा नऊ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण

२४५५ पथके कार्यरत

संग्रहित छायाचित्र

राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्णांचे समूह (क्लस्टर) सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना अमलात आणण्यात येत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रासाठी २९२ पथके काम करीत आहेत. पुण्यात ४१३, नागपुरात २१० पथके कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत घरोघर सर्वेक्षणाचे काम केले जात असून राज्यभरात सुमारे १८ जिल्ह्य़ांमध्ये एकूण २४५५ पथके सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. गुरुवापर्यंत सुमारे नऊ लाख २५ हजार ८२८ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

मुंबई (२९२), पुणे (४१३), पिंपरी- चिंचवड (३८), ठाणे (१४०), कल्याण-डोंबिवली (८२), नवी मुंबई (१६९), उल्हासनगर (९०), पनवेल (६५) या महापालिका, पुणे ग्रामीण भाग (३३१),  रत्नागिरी (५४), अहमदनगर जिल्हा (१५) व महापालिका क्षेत्र (२५), यवतमाळ (५२), नागपूर महापालिका (२१०), सातारा (१८२), सांगली (३१), पालघर जिल्ह्य़ातील वसई विरार (७०), सिंधुदुर्ग (१९), कोल्हापूर महापालिका (६), गोंदिया (२०), जळगाव महापालिका (३६), बुलढाणा (९४), नाशिक ग्रामीण (२८) क्षेत्रात सध्या ही सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत.

ज्या भागात कोरोनाचे तीन किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तेथे क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना राबविली जात आहे. त्यानुसार बाधित रुग्ण ज्या भागात राहतो तेथून साधारणपणे तीन किलोमीटपर्यंतच्या भागाचे सर्वेक्षण केले जाते. त्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून घरोघर जाऊन लोकांचे सर्वेक्षण केले जाते. सध्या राज्यात ज्या भागात एक रुग्ण जरी बाधित आढळून आला तरीदेखील सर्वेक्षणाचे काम केले जात असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.

सर्वेक्षण करण्यासाठी कंटेनमेंट झोन निश्चित झाल्यानंतर त्या भागाचा नकाशा तयार केला जातो. त्यातील घरांची संख्या त्याची लोकसंख्या विचारात घेऊन पथके तयार केली जातात. त्यांना विभाग वाटून दिला जातो. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळात सर्वेक्षणाचे काम केले जात असून पथकातील सदस्य घरोघरी जाऊन नागरिकांना सर्दी, ताप खोकला, श्वास घेताना होणारा त्रास आदीबाबत माहिती घेतली जाते. लक्षणांनुसार रुग्णांची यादी तयार केली जाते. ती संबंधित आरोग्य अधिकाऱ्याला दिली जाते. ज्या पथकाला जो विभाग नेमून दिला आहे त्याच पथकाने पुढील १४ दिवस दररोज सर्वेक्षण करायचे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास संबंधित आरोग्य अधिकारी मोठय़ा रुग्णालयाकडे त्याला पाठवतो.

या पथकामध्ये आरोग्य कर्मचारी, एएनएम, हिवताप निर्मूलन कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आवश्यकता भासल्यास नर्सिग महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा समावेश केला जातो. या पथकामार्फत सर्वेक्षणासोबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे महत्त्वपूर्ण कामही केले जाते. शिवाय कोरोनाबाबत जनप्रबोधनचेही काम केले जाते. नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. त्यांना योग्य ती माहिती द्यावी, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठी मदत होईल, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 12:53 am

Web Title: survey of all nine lakh citizens completed under cluster containment action plan abn 97
Next Stories
1 आधी विकतचे धान्य घ्या, मग मोफतचे मिळेल ही राज्याची अट
2 अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
3 केशरी शिधापत्रिका धारकांनाही मोफत धान्य द्या- शेलार
Just Now!
X