‘पोलिसांच्या सेवेला नेहमीच गृहीत धरले गेले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतची आपली वागणूकही कायम कृतघ्नपणाची राहिली आहे,’ अशा शब्दांत ‘टाटा समूहा’चे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी पोलिसांना देण्यात येणाऱ्या सापत्न वागणुकीबाबत खंत व्यक्त केली. पोलीस दलात कार्यरत असताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी राज्याचे माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग, अतिरिक्त पोलीस आयुक्त सॅम पटेल आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील या तीन अधिकाऱ्यांना माजी पोलीस आयुक्त अरविंद इनामदार फाऊंडेशनतर्फे बुधवारी ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या वेळी टाटा यांनी हे ही खंत व्यक्त केली.
टाटा आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्या हस्ते या माजी पोलिसांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. पोलीस दलात कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांची ती कामगिरी काळाच्या ओघात विसरली गेली आहे. त्यांच्या त्या कामगिरीला उजाळा व सलाम म्हणून त्यांचा गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला आहे, असे इनामदार यांनी पुरस्कारामागील कल्पना स्पष्ट करताना सांगितले. तसेच इनामदार यांनी जोग यांच्या कामाला वाहून घेण्याच्या वृत्तीची अनेक उदाहरणे दिली. ‘जोग यांच्या मुलाचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. परंतु त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्याच्या दोन तासांनंतर जोग हे आपल्या कार्यालयात जणू काही घडलेच नाही अशा आवेषात काम करत होते. त्यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस दलाची प्रतिमा उजळवली,’ असेही इनामदार यांनी प्रामुख्याने नमूद केले. १९९३ सालच्या दंगलींनंतर मुंबईत सामाजिक सलोखा निर्माण करण्यात सॅम पटेल यांनी खूप मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कामगिरीला दोन्ही समुदायांकडूनही शाब्बासकीची थाप मिळाली. सेवेतून निवृत्त झाले की पोलिसांच्या कामगिरीचाही सगळ्यांना विसर पडतो. परंतु इनामदार यांनी हीच बाब लक्षात घेत पोलिसांच्या त्या कामगिरीचा गौरव करण्याचे ठरवले यासाठी पटेल यांनी इनामदार यांचे आभार मानले. तर मालेगावसारख्या अतिसंवेदनशील भागांत काम केलेल्या आणि सामाजिक सलोख्यासाठी सतत प्रयत्नात राहिलेल्या दिलीप पाटील यांनीही या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना आयुष्यातील हा परमोच्च क्षण असल्याचे म्हटले.