अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. सुशांतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी कलाविश्वातील अनेक दिग्गजांवर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच सध्या पोलीस यंत्रणा या प्रकरणी कसून चौकशी करत आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी कलाविश्वातील अनेकांची चौकशी केली असून त्यात सुशांतसंदर्भातील अनेक गोष्टींची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत २८ जणांचा जबाब नोंदविला आहे. त्यानंतर आता संजय लीला भन्साळी यांची चौकशी होणार आहे. ही चौकशी करण्यापूर्वी भन्साळी यांना पोलिसांनी समन्स बजावले होते.

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या दोन चित्रपटांसाठी सुशांतला साइन केलं होतं. मात्र ऐनवेळी त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. म्हणून  सुशांत नैराश्यात गेला असं म्हटलं जात आहे. त्यामुळेच या प्रकरणी संजय लीला भन्साळी यांची चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, सुशांतने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु काहींच्या मते नैराश्यात येऊन त्याने आत्महत्या केली. तर बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने जीवनाचा अंत केल असं म्हटलं जात आहे.