सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर वेगाने हालचाली घडत आहेत. सीबीआयकडून सुशांत सिंहच्या शवविच्छेदन अहवालाची तपासणी करण्यात येणार असून यासाठी एम्स रुग्णालयाची मदत मागण्यात आली आहे. एम्सकडून पाच डॉक्टरांची टीम गठीत करण्यात आली आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी आम्ही हत्येची शक्यता तपासणार असल्याचं सांगितलं आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

सुधीर गुप्ता यांच्याकडे डॉक्टरांच्या टीमचं नेतृत्त्व करणार आहेत. “हत्येची शक्यता आम्ही पडताळून पाहणार आहोत. मात्र यावेळी इतर सर्व बाबीही तपासल्या जातील,” असं डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सांगितलं आहे. “टीम सुशांतच्या शरीरावर असणाऱ्या जखमा आणि परिस्थितीजन्य पुरावे यांच्यातील साधर्म्य तपासून पाहणार आहे. याशिवाय सुशांत मानसिकरित्या त्रस्त असल्याने घेत असलेल्या औषधांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न असेल,” अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

आणखी वाचा- ‘तो फोन कोणी केला?, मृतदेह आधी कोणी पाहिला आणि…’; सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंहला CBI ने विचारले हे दहा प्रश्न

सीबीआयने शुक्रवारी सुशांतच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी एम्समधील फॉरेन्सिक विभागाची मदत मागितली. सीबीआयने एम्सला पाठवलेल्या पत्रात वैद्यकीय कागदपत्रं, शवविच्छेदन अहवाल, व्हिडीओ तसंच गरज असणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या जातील असं सांगितलं आहे. एम्सचे डॉक्टर मुंबईत येण्याचीही शक्यता आहे.

सीबीआय टीम जवळपास १० दिवस मुंबईत तपास करणार आहे. सीबीआयकडून टीम तयार करण्यात आल्या असून त्यांच्यावर वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आणखी वाचा- सीबीआयचं पथक पोहोचलं सुशांत सिंहच्या घरी; पाहणी करतानाचे फोटो आले समोर

सीबीआयची १० सदस्यीय टीम गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाली. पोलीस अधीक्षक नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखाली टीम तपास करत आहे. सीबीआय टीमकडून सुशांतच्या स्टाफ कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडून सर्व कागदपत्रं घेतली आहेत. यामध्ये सुशांत सिंहचा शवविच्छेदन अहवालाचाही समावेश आहे. सुशांतच्या स्वयंपाकीचीही सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे.