सुशांत सिंह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हे प्रश्न विचारले असून राज्य सरकारला विचारणा केली आहे. आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी घेणार का? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही. “सिंघम”चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे. पण सुशांत सिंह रजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही? कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक,ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही? कुणी,मुंबई पोलिसांना बोलू दिले नाही?”.

“पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात, पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का? सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला. याप्रकरणी आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?,” असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
सुशांत सिंह प्रकरण: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“….रिया चक्रवर्तीची लायकी नाही,” बिहारचे पोलीस महासंचालक मीडियासमोरच संतापले

सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने निर्णय सुनावताना, मुंबई पोलिसांना सर्व पुरावे सीबीआयकडे हस्तांतरित करण्यास सांगितलं. तसंच सीबीआयला तपासात सहकार्य करण्यासही सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचं यावेळी म्हटलं.