अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची चौकशी करणाऱ्या वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी यश राज फिल्मसच्या दोन माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली. सुशांत सिंह राजपूतने २०१२ साली यश राज फिल्मस बरोबर करार केला होता. या करारावर आशिष सिंह आणि आशिष पाटील या दोघांच्या स्वाक्षऱ्या होत्या. आशिष सिंह हे यश राज फिल्मसचे माजी उपाध्यक्ष आहेत तर आशिष पाटीलही तिथे वरिष्ठ पदावर होते. पोलीस दलातील सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आशिष सिंह यांची जवळपास पाच तास चौकशी सुरु होती. त्यांनी सुशांतच्या यशराज फिल्मसबरोबर असलेल्या कराराची सर्व माहिती दिली. सुशांतची वायआरएफमधून एक्झिट आणि हा कॉन्ट्रॅक्ट नेमक्या कशा स्वरुपाचा होता, याबद्दल आशिष सिंह इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना  म्हणाले की, “मी कराराबद्दल कुठल्याही गोष्टी उघड करणार नाही. खूप खेळीमेळीच्या वातावरणात सुशांत करारामधून बाहेर पडला. त्यानंतरही आम्ही संपर्कात होतो. आम्ही दोन चित्रपट केले. काही चित्रपट पूर्णत्वाला जाऊ शकले नाहीत. सुशांत पाच वर्षांपूर्वी वायआरएफमधून बाहेर पडला. त्यानंतरही आम्ही संपर्कात होतो. कुठलाही वादाचा विषय नव्हता. आपण त्याच्यासाठी प्रार्थना करुया.”

आशिष पाटील यांची सुद्धा सुशांतचा करार, काम आणि वायआरएफमधून एक्झिट याबद्दल चौकशी करण्यात आली. या आठवडयाच्या सुरुवातीला पोलिसांना यश राज फिल्मसकडून सुशांत आणि वायआरएफमध्ये झालेल्या कराराची कॉपी मिळाली. त्याचा अभ्यास केल्यानंतर वायआरएफच्या दोन माजी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. सुशांतशी संबंधित असलेल्या २५ जणांची जबानी आतापर्यंत नोंदवण्यात आली आहे.

‘सुशांतची आत्महत्या साधी नाही’; शेखर सुमन यांनी केली सीबीआय चौकशीची मागणी
अभिनेता शेखर सुमनने देखील या प्रकरणाची पुन्हा चौकशी करा असं म्हणत सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. “सुशांत हा संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे. येथील प्रत्येक व्यक्ती तुझ्यासोबत आहे. आम्ही सगळे तुला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करतोय आणि हो तुला न्याय मिळेलच”, असं म्हणत शेखर सुमन यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.